एसटीच्या मालवाहतूक दरात 1 मेपासून वाढ, प्रति कि.मी.दर 48 वरून 57 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाने अलिकडेच उत्पन्न वाढीसाठी सुरू केलेल्या मालवाहतूक सेवेच्या दरात वाढत्या इंधन दरामुळे 1 मेपासून वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एकेरी वाहतुकीसाठीचा किमान दर आधी चार हजार रुपये होता. आता नव्याने निर्णयाने किमान दर 4 हजार 500 रुपये इतका वाढविण्यात आला आहे, तर आधी 100 कि.मी.पर्यंतच्या वाहतुकीसाठी 48 रु.प्रति कि.मी. दर होता. तर 101 कि.मी. ते 250 कि.मी.साठी 46 रु.प्रति कि.मी. दर होता तो आता 200 कि.मी.पर्यंत 57 प्रति कि.मी. तर 201 कि.मी.च्या पुढे 55 रू.प्रति कि.मी. अशी दर वाढ करण्यात आली आहे.

एसटीने आपला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न घटल्याने उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यात एसटीने मालवाहतुकीस प्रारंभ केला होता. या मालवाहतुकीसाठी एसटीने आपल्या गाड्यांमध्ये काही बदल करीत त्यांचा मालवाहू ट्रक प्रमाणे वापर करीत मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. महामंडळाच्या वतीने मालवाहतूकीसाठी प्रति दिवस कमीत कमी 4000 रुपये दर ठरविण्यात आला होता, परंतु सदरचा दर जातानाचे आणि येतानाचे कि.मी. ग्राह्य धरून रू. 48 प्रति कि.मी. पेक्षा कमी आकारला जाणार नाही याची दक्षता घेतली जात होती. आता नव्या निणर्याने डिझेलमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने मालवाहतुकीसाठी किमान दर 4,500 रुपये करण्यात आला आहे. परंतु हा दर जाताना आणि येतानाचे कि.मी. ग्राह्य धरून रू.57 प्रति कि.मी.पेक्षा कमी आकारला जाऊ नये, जर जाताना व येताना एकाच पार्टीकडून बुकींग असेल तर एकेरी वाहतूकीसाठी किमान भाडे 4,500 रु.आकारावे असे एसटी महामंडळाने सर्व आगारांच्या प्रमुखांना जारी केलेल्या आदेशा म्हटले आहे.