आभाळमाया – वैश्विक वेगवंत-अवकाशगामी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

पक्ष्यांना आकाशगामी म्हणजे आकाशात विहार करणारे असं म्हटलं जातं. त्यांच्या पंखांपासून स्फूर्ती घेऊनच माणसाने ‘उडण्याचा’ ध्यास धरला. अर्थात पंख नसल्याने अन्य साधनांशिवाय उडता येणं अशक्य होतं. अखेरीस, यंत्रयुगाने केलेल्या अनेक ‘चमत्कारां’पैकी एक म्हणजे विमानाचा उदय झाला 17 डिसेंबर 1903 रोजी राइट बंधूंनी 59 सेकंद एवढा वेळ त्यांच्या ‘फ्लायट’ या जगातल्या पहिल्या यशस्वी विमानाचं उड्डाण केलं आणि आकाश माणसाच्या अंकित झालं.

पुढचा टप्पा होता अवकाशाचा म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पडून अंतराळात भिरभिरण्याचा. हे प्रयत्न वेगवेगळय़ा पद्धतीने होत गेले. अंतराळात केवळ ‘जाणे’ हा पहिला टप्पा आणि पृथ्वीभोवती अंतराळातून परिक्रमा करणे हा पुढचा टप्पा. जगातलं पहिलं विमान उडाल्यानंतर अवघ्या अर्धशतकात माणसाची भरारी पृथ्वीचं वातावरण भेदून गेली. आता त्याची नजर ‘शून्यमंडळा’कडे लागली.

त्यासाठी पुरेसं तंत्रज्ञान, पैसा आणि इंधनाची गरज होती. ध्वनीपेक्षा सुमारे वीस पट वेगात किंवा सेकंदाला 11 किलोमीटर वेग धारण करू शकणारं यान उडवलं तर ते वातावरण पार करून जाईल याची निश्चिती झाली. संशोधक कामाला लागले. स्पेसमध्ये जाणारी रॉकेट्स तयार झाली. पण 4 ऑक्टोबर 1957 रोजी रशियाने (तेव्हाचा यू. एस. एस. आर.) कमाल केली. ‘स्पुटनिक-1’ नावाचा कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरता करून जगाला सुखद धक्का दिला. सेकंदाला 8 किलोमीटर वेगाने उडालेल्या स्पुटनिक-1 या जगातल्या पहिल्यावहिल्या कृत्रिम उपग्रहाने अवघ्या 96 मिनिटांत पृथ्वीभोवती फेरी मारली नि जग विस्मयचकित झालं.

यामागे अंतराळ प्रवासाचं गणित होतं. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण पार करून अवकाशात उपग्रह नेण्याएवढी गती त्याला देणं गरजेचं होतं. सेकंदाला अकरा किलोमीटर वेग रॉकेटने प्राप्त करायचा तर त्याला तेवढी ऊर्जा देणारं इंधनही हवं. ही गोळाबेरीज बरोबर जमली आणि स्पुटनिक उडाला.

तरीसुद्धा आता ही ‘जुनी’ गोष्ट झाली. कारण त्यापुढच्या अर्धशतकात एकूणच मानवी जीवन गतिमान आणि यांत्रिक झालं. त्याचा प्रभाव आज सर्व क्षेत्रांत दिसतो. सारं काही ‘आज, आत्ता, ताबडतोब किंवा ‘इन्स्टन्ट’ या शब्दांभोवती फिरताना दिसतं… आणि स्पेसमध्ये तर ‘बघू या की’ असा निवांतपणा चालणारच नाही. तिथे क्षणाक्षणाचा नव्हे तर ‘नॅनोसेकंदा’चा हिशेब असतो. अवकाशात उडणाऱया यानांची गती आणि प्रगती पृथ्वीवरून ‘रिमोट कंट्रोल’ पद्धतीने ठरवली जाते. कोणतं यान कुठे जाणार यावर त्याची गती कशी व कधी वाढवायची आणि योग्य वेळी ती कमी कशी करायची याचं तपशीलवार गणित मांडलं जातं. त्यात थोडीशी गफलत झाली तरी गडबड कशी होते हे आपण चांद्रयान-2 च्या वेळी अनुभवलं. अर्थात असे अपयशाचे धक्के सर्वच देशांमधल्या संशोधकांना केव्हा ना केव्हा बसलेले आहेत.

स्पुटनिक-1 नंतरची डोळे दिपवणारी अवकाश मोहीम म्हणजे अपोलो-11 या अमेरिकन यानाची. त्यातले तीन अंतराळवीर प्रथमच चंद्राचं जवळून दर्शन घेणार होते आणि दोघे ‘इगल’ या अवतरकातून (लँडरमधून) थेट चंद्रावर उतरणार होते. 20 जुलै 1969 रोजी माणसाने चंद्र पादाक्रांत केला. त्या ‘अपोलो’चा वेग होता ताशी 38946 किलोमीटर. चंद्रावर उतरताना चांद्रकक्षेत गेल्यावर तो थोडा ‘कमी’ करून 3280 किलोमीटर करण्यात आला.

तरी चंद्र आपल्या अगदीच आवाक्यातला असं आता म्हणता येतं, कारण आपली पाच यानं सूर्यमालेपलीकडेही गेली आहेत. मंगळ तसा जवळचा ग्रह, पण चंद्र अवघा 4 लाख किलोमीटर तर मंगळ पाच ते सात कोटी किलोमीटर अंतरावरचा शेजारी. या मंगळावर पहिलं यान पाठवलं गेलं तेव्हा त्याचा वेग ताशी 24600 किलोमीटर होता. या वेगाने सात महिने म्हणजे सुमारे 4 कोटी 80 लाख किलोमीटर प्रवास करून यान मंगळकक्षेत पोचलं!

गुरू तर मंगळापुढचा. सुमारे 75 कोटी किलोमीटर दूर. तिथे अशा वेगाने जायचं तर पाच-सात वर्षं लागतील. पण पायोनिअर-10 हे यान गुरूकडे निघालं 1972 मध्ये आणि वर्षभरात पोचलं. पायोनियर-11 तर गुरुपासून अवघ्या 21 हजार किलोमीटरपर्यंत गेलं होतं.

अशा वेळी पृथ्वी आणि इतरही ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा आणि वेगाचा वापर यानाला ‘ग्रॅव्हिटेशनल ऍसिस्टन्स’ किंवा ‘स्लिंग शॉट’ (गोफणफेक) पद्धतीने वेगवान करता येतं. 50 किमी वेगाने येणाऱया ट्रेनकडे 30 किलोमीटर वेगाने चेंडू भिरकावला तर तो आपटल्यावर त्याला 80 किलोमीटरचा वेग प्राप्त होतो. हे थोडं क्लिष्ट वाटलं तरी उपग्रह पाठवण्याचं इंधन आणि खर्च वाचवायचा तर मधल्या अनेक ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करत यान पाठवणं सोयीचं ठरतं. ते त्याचा वेग नैसर्गिक नियमाने वाढवतात. यात वेळ अधिक लागतो, पण मोठी बचत होते. शेवटी पैशाचा वेग आवरता घ्यावाच लागतो!