करावरून ‘कीरकीर’, सर्व दोष राज्यावर ढकलून मोदी जबाबदारी झटकताहेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारांमुळेत पेट्रोल-डिझेलचे दर चढे राहिल्याचा आरोप केला. यावर आता विविधी राज्यांनी केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील सेस घटवावा आणि जीएसटीची बाकी रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आणि जबाबदारीपासून पळून सर्व दोष राज्यांवर ढकलत असल्याचा आरोप केला.

इंधनाची दरवाढ – राज्यांना दोष, कोळश्याचा तुटवडा – राज्यांना दोष, ऑक्सिजनचा तुटवडा – राज्यांना दोष, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकार सर्व दोष राज्यावर ढकलत असल्याचे ट्विट केले आहे. तसेच इंधनावरील करातील 68 टक्के वाटा केंद्र सरकार घेते, तरीही पंतप्रधान जबाबदारी झटकतात. मोदींचे संघराज्य सहकाराचे नाही, तर जबरदस्तीचे आहे, असेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

काय म्हणाले मोदी?

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत मी विनंती केली. त्यावेळी काही राज्यांनी ऐकले नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, झारखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तामीळनाडू या राज्यांनी ऐकले नाही आणि या राज्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर चढेच राहिले, नागरिकांवरील करांचे ओझे कायम राहिले, असे तार्किक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडले.

केंद्राकडे 97 हजार कोटी

पेट्रोल-डिझेलचे दर राज्यांनी कमी करावे या पंतप्रधानांच्या विधानावर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना बोलू दिले नाही आणि एकतर्फी वक्तव्य करून भ्रम पसरवला. पश्चिम बंगालने गेल्या तीन वर्षात पेट्रोल-डिझेलवर सबसिडीसाठी 1500 कोटी खर्च केले आहेत. केंद्राकडे आमचे 97 हजार कोटी रुपये आहेत, असेही त्या म्हणाल्या.

सेस रद्द करा

तेलंगाणा सरकारने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा निशेष केला आहे. उद्योग आणि वाणिज्यमंत्री केटी रामाराव यांनी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर लावलेला सेस रद्द करावा अशी मागणी केली आहे. टीआरएस नेत्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.