जैव संकेत – मधुमीलनात या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. श्री. दे. नाईक

चाळीस आठवडय़ांच्या गर्भधारणेनंतर माता बाळाला जन्म देते. जगातल्या सध्याच्या सुमारे सात अब्ज माणसांची निर्मिती अशीच झाली आहे. त्यातही जैविक किमया म्हणजे काही अपवाद वगळता प्रत्येकाचा तोंडावळा म्हणजे दिसणं निराळं आणि बोटांचे ठसे वेगवेगळेच!

वैवाहिक जीवनातला उत्कट क्षण म्हणजे मधुमीलन. आणि थोडय़ाच काळात चाहूल लागते तिसऱया जिवाची. काव्यानंदात याचं वर्णन ‘मधुरात्र मंथर देखणी’ अशा चपखल शब्दात कवी करतो, परंतु जैवविज्ञानात तो एक निर्मितीक्षम पेशींचा खेळ असतो. निर्हेतुक निसर्ग त्याच्याकडून घडणाऱया गोष्टींची अपेक्षा धरत नाही, पण जीवनचक्र सुरू राहतं. एकपेशीय सजीवाची निर्मिती पृथ्वीवर झाल्यानंतर बहुपेशीय जीव आणि त्यांच्यातील उक्रांती होत होत आपण म्हणजे होमोसेलियन मनुष्यप्राणी जन्माला आला.

वैद्यकीय भाषेत मधुमीलन म्हणजे स्त्री-पुरुष बीजांचा संयोग. त्यातील जनन संस्थेची थोडक्यात माहिती द्यायची तर वयात आलेल्या मुलीला पाळी येते आणि स्त्रीबीज तयार होऊ लागते तसंच वयात आलेल्या मुलाचं पुरुषात रूपांतर होताना वीर्यनिर्मिती होत असते याची जाणीव आता शिक्षणक्रमातूनही करून दिली जाते.

नवा जीव चाळीस आठवडय़ांत इथेच पूर्व व्यक्तीचा आकार घेणार असतो. स्त्रिच्या ओटीपोटात असलेल्या गर्भाशयाचे दोन भाग म्हणजे मुख (ग्रीव्हा) आणि पिशवी. तीन आवरणांचे गर्भाशय गर्भ अगदी सुरक्षित ठेवते. बाहेरचे आवरण म्हणजे पेरियेनियम. मधलं आवरण आकुंचन-प्रसरण होणाऱया स्नायूंचं आणि आती मखमलीसारखा मृदू-मुलायम थर म्हणजे ‘एन्ड्रोमेट्रियम!’ फलित बीजांच्या स्वागताला हा मखमली मार्ग आतुर असतो. मीलन यशस्वी झालं नसेल तर हा थर पाळीच्या वेळी बाहेर टाकला जातो आणि नंतर पुन्हा नव्या फलित बीजांच्या प्रतीक्षेत असतो. म्हणूनच गर्भाशयाला ‘आशावादी’ अवयव म्हणतात.

स्त्री पुरुषांचं मीलन होताना गर्भनलिका किंवा फेलोविअन टय़ुबची भूमिका फार महत्त्वाची. नलिकेचे एक टोक गर्भाशयात तर दुसरं स्त्रिच्या ओटीपोटातील बीजांडकोषापाशी उघडतं. त्या भागातील नाजुक फुग्यासारख्या ‘ऍम्प्युला’ म्हणतात. बीजांड म्हणजे गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला बदामाच्या आकाराच्या असणाऱया ‘ओव्हरी’ त्यांचं एकत्रित वजन अवघं 3 ते 4 ग्रॅम. त्यामध्ये स्त्रिच्या जन्माच्या वेळी 20 ते 40 लाख स्त्री बीज पेशी असतात. मुलगी वयात येईपर्यंत त्यांची संख्या कमी होऊन 40 ते 50 हजारच उरतात. त्यापैकी जननक्षम काळात (10 ते 45 वर्षे) 300 ते 400 बीज पेशी, गरोदरपणाचा काळ सोडून फलित (परिपक्व) होऊ शकतात.

मुलीच्या वाढीत इस्ट्रोजन संप्रेरक (हार्मोन) तिला यौवन प्राप्त करून देते ते प्रोजेस्टेशन हॉर्मोनमुळे फलित बीजाच्या स्वागतासाठी गर्भाशयात ‘रेड कार्पेट’ किंवा मखमली थर तयार होतो. हे सगळं थोडं विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसाचा जन्म निसर्गनिर्मित अशा किती गुंतागुंतीच्या, परंतु अत्यंत कौशल्यपूर्ण यंत्रणेतून होतो हे लक्षात यावं. ते लक्षात आलं तर आपलं शरीर किती मोलाचं आणि जीवसृष्टीतला एकमेवाद्वितीय घटक आहे हे ध्यानात येऊन त्याबाबत काळजी घेतली जाईल.

[email protected]