देशाचे शत्रू संपवण्यापेक्षा पक्षाचे शत्रू संपवण्याचे काम सुरू आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डागली भाजपवर तोफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विक्रांत निधीमध्ये घोटाळा करणारे भ्रष्टाचाराचे मेरूमणी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात आहेत असे सांगत आहेत. तुमची ओळख नसताना, तुम्हाला काडीची किंमत नसताना मांडीवर घेतले आणि आम्ही या नकली व बनावट हिंदुत्ववाद्यांना पोसले. चीनमधील बनावट मालाप्रमाणे हे बनावट हिंदुत्ववादी आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर तोफ डागली. सध्या दमदाटी करण्याचे आणि सुके डोस देण्याचे काम सुरू आहे. देशाच्या शत्रूंपेक्षा पक्षाचे शत्रू संपवण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.

26 ते 29 मे या काळात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकणात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱयांशी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधला.

शिवसेना पदाधिकाऱयांशी संवाद साधताना ते म्हणाले की, खूप दिवसांनी राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवत आहोत. दोन-अडीच वर्षे कोरोनामध्ये गेली. पण इतर पक्ष कोणत्याही मुहूर्ताची वाट न बघता गावोगावी जात आहेत, लोकांशी संपर्क साधत आहेत. आपणही मागे राहून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीला वेळ आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होतील. आपण दोन-चार महापालिकांवर जोर दिला आणि इतर महापालिकांमध्ये युतीत होतो. पण आता आपण युतीमधून वेगळे झालेलो आहोत आणि महाविकास आघाडी केली. या महाविकास आघाडीने कोल्हापूरची पोटनिवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसैनिकांनी पुढाकार घेतला आणि तो घेण्याची गरज होती, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

हिंदूंमध्ये फोडाफोड करण्याचे काम

दोन समाजात- धर्मात दुही माजवण्याच्या प्रकाराचा उल्लेख करताना ते म्हणाले की, हिंदूंमध्ये फोडाफोड करण्याचे काम सध्या सुरू आहे. मुंबईत मराठी-अमराठींमध्ये फूट पाडण्याचे प्रकार सुरू झाले. दंगली सुरू होतील इतक्या घाणेरडय़ा पातळीवर राजकारण नेले जात आहे. तू कमी हिंदू, मी जास्त हिंदू असे काही नाही, पण ही भाजपची एक चाल आहे.

खालच्या पातळीवरचे राजकारण

सध्याच्या राजकारणावर खंत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, आता मला अनेक शब्दांचे अर्थ कळायला लागले. पूर्वी माहिती होतेच, पण तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, राजकारणाचे गजकर्ण झाले आहे. जेवढे खाजवावे तेवढे कमीच. आता खाजवून खाजवून सर्व ठिकाणी खरूज झाली आहे. तरीही खाजवत बसले आहेत. एवढय़ा खालच्या पातळीवर राजकारण सुरू झाले आहे.

बंगाली लोकांचा पराक्रम

पश्चिम बंगाल व केरळच्या निवडणुकांचा दाखला देताना ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना भाजपने हिंदूद्वेष्टे म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला. पण बंगाली लोकांनी एक पराक्रम केला. त्यांनी भाजपचा डाव बरोबर ओळखला. आपले कोण आणि परके कोण हे त्यांनी बरोबर ओळखले. ते फसले नाहीत. आणि हिंदू-मुस्लिमांनी एकत्र होऊन ममता बॅनर्जींना मागील वेळेपेक्षा जास्त मतांनी निवडून आणले. हे बंगालचे मोठे कर्तृत्व आहे. महाराष्ट्राने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

भाजपला पोटदुखी झाली

भाजपच्या पोटदुखीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून माझे सर्वांनी कौतुक केले. माझे नाव देशातल्या पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत आले. भाजपच्या राज्यातील कोणी मुख्यमंत्री या यादीत नव्हता, पण तेव्हाच भाजपच्या पोटात दुखले. मुख्यमंत्री म्हणून मला कोणताही अनुभव नव्हता. सरकार पडेल असे सतत त्यांना वाटत होते. पण मी प्रशासन व राज्य चांगल्या प्रकारे चालवले, कोरोनामध्ये उत्तम काम केले. कोरोना काळातील आपल्या कामाचे कौतुक सर्वोच्च व उच्च न्यायालयाने केले. जागतिक पातळीवर कौतुक झाले. आजही परदेशातील माझे परिचित व मित्रमंडळी भेटतात तेव्हा ते आवर्जून सांगतात की, महाराष्ट्राने कोरोना काळात केलेल्या कामाचे परदेशात कौतुक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगले काम केले असे परदेशातील लोकही बोलतात. पण हाच भाजपचा पोटशूळ आहे.

अयोध्या दौरा

कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता अयोध्या दौऱयावर भाष्य केले. अयोध्येत तेव्हा संघर्ष सुरू असताना आणि जेव्हा गरज होती तेव्हा मी अयोध्येत गेलो आहे. आता काहीजण राजकीय सहल म्हणून अयोध्येला जातात, असा टोलाही त्यांनी मारला.

संयुक्त महाराष्ट्र समिती जनसंघाने फोडली

उद्याच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांनी जनसंघाची आठवण सांगितली. त्यांच्याकडे झेंडा नव्हता, कार्यकर्ते नव्हते. कार्यकर्ते डोक्यावर टोप्या घालायचे आणि लोकांना टोप्या घालायचे (हशा). जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू आणि संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. पण मराठी माणसाला पूर्वीपासून दुहीचा शाप आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती पहिली जनसंघाने फोडली. जागा वाटपावरून ही समिती फोडली. ही समिती फोडण्याचे पाप तेव्हा जनसंघाने केले होते.

विरोधकांचा समाचार घेणार

राज्य सरकारचे कोरोना काळातील मागील अडीच वर्षांचे काम कौतुकास्पद आहे. त्यावर पाणी टाकण्याचे काम भाजपला करायचे आहे. विरोधकांकडून होणाऱया सर्व आरोपांचा परामर्ष मी 14 मे रोजी मुंबईत होणाऱया व त्यापुढे मराठवाडय़ात होणाऱया सभेत घेणार आहे असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेची कामे लोकांना सांगा

परळमधील चंद्रभागा शिंदे यांच्या भेटीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मी लहान असल्यापासून त्यांना बघतो आहे. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्या सहभागी होत होत्या. मी त्यांच्या घरी गेलो. पण प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी जाऊ शकत नाही. पण माझ्या वतीने तुम्ही त्यांच्या घरी गेले पाहिजे. शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेने केलेली कामे लोकांना कळली पाहिजेत.

फटकारे

n आम्ही भाजपचे शत्रू कधी नव्हतो. पण आमचा गुन्हा काय तर तुमची ओळख नसताना, तुम्हाला काडीची किंमत नसताना मांडीवर घेतले.
n मराठीबद्दल प्रेम नाही. हिंदुत्वाबद्दल प्रेम नाही. यांना फक्त स्वतःबद्दल प्रेम हाच त्यांचा अजेंडा आहे.
n जे कर्माने मरणार आहेत त्यांना धर्माने मारण्याची गरज नाही.
n शिवसेनेच्या निखाऱयावर जर राख साठली असेल तर ती फुंकून टाका आणि शिवसैनिकांचा अंगार फुलवा.
n शिवसेनेचे अंगार पाहिल्यावर भंगार लोक आपल्या नादीच लागू शकणार नाही.