
देशाच्या कानाकोपऱयात विविध कला आणि त्यांचे उपासक आढळून येतात. प्राचीन कलेचा वारसा ते जतन करताना दिसतात. ओडिशातील मगा नायक हे त्यापैकीच एक. पोथी चित्रांचा उपासक अशी त्यांची ओळख आहे. पुढील हजार वर्षे तरी पोथी चित्रशैली जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने 77 वर्षीय मगा नायक प्रयत्न करत आहेत.
ओडिशामध्ये ताडपत्रावरील चित्र म्हणजेच पोथी चित्र ही कला खूप लोकप्रिय आहे. पट्टचित्रशैलीचाच हा एक भाग आहे. ताडपत्र म्हणजे पट्टीसारख्या आकारात कापलेले ताड वृक्षाचे पान. त्याचा साधारण 1 ते 5 इंच असा लहानात लहान आकार असतो. ताडपत्राच्या अनेक पट्टय़ा एकमेकांना सुईदोऱयाच्या सहाय्याने टाचून मोठय़ा आकारात चित्रे काढली जातात. चित्र काढण्यासाठी जे अणुकुचीदार हत्यार वापरले जाते, त्याला ओडिया भाषेत ‘लिखन’ असे म्हटल जाते. पौराणिक कथा, श्लोक, ओडिया भाषेतील हस्तलिखित पोथी चित्रांमध्ये आढळतात. वयाच्या सहाव्या वर्षापासून नायक पोथी चित्रे काढत आहेत.
मगा नायक ओडिशाच्या नायकपटणा गावात राहतात. गेल्या 65 वर्षांपासून त्यांचे वेळापत्रक बदललेले नाही. दररोज सकाळी ते कामाला सुरुवात करतात. जमिनीवर बसतात. त्यांच्या हातात लिखन म्हणजे धातूची सुई असते. सोबत ताडाच्या पानांचा रोल असतो. दिवसाला ते सात ते आठ तास काम करतात. एक महिना किंवा एक वर्ष हा मास्टरपीस करायला लागते. होय ही कलाकृती म्हणजे मास्टरपीसच म्हणता येईल. कारण कलाकृती बनवायला दोन लाख इतका खर्च येतो.
12 व्या शतकात पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या स्थापनेपासून आम्ही ही कला जिवंत ठेवली आहे. ताड वृक्षांची पाने जतन करण्यासाठी पूर्वापार चालत आलेली प्रक्रिया वापरतो. पुरीच्या पोथी चित्रशैलीला जीआय टॅग मिळवण्याच्या दृष्टीने ही कला संर्वधक करत आहोत, असे नायक यांचा मुलगा प्रशांत यांनी सांगितले.
500 वर्षांपूर्वींचा खजिना
पुढील हजार वर्षे तरी पोथी चित्रंशैली जीवंत राहावी, यादृष्टीने नायक कुटुंब काम करत आहे. या कलेच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना मदत करत आहेत. नायक यांच्याकडे 500 वर्षांपूर्वीचा जुना खजिना आहे. त्या पोथी चित्रांवर कुंडली, राशी, श्लोक असा मजकूर आहे.
ही पारंपरिक कला आम्ही जतन करत आहोत. ती पुढील हजार वर्षे तरी रहावी, हा उद्देश. पाचशे ते सातशे वर्षांपूर्वीची पोथीचित्रं आम्ही नीट सांभाळून ठेवली आहेत. याशिवाय 30 ते 40 जणांना या चित्रशैलीचे मोफत प्रशिक्षण देत आहोत. – मगा नायक, पोथी चित्र कलाकार























































