बाबरी ढाचा पाडताना मी तेथे होतो! देवेंद्र फडणवीस यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ती बाबरी मशीद नव्हती तर परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा तो ढाचा होता. तो ढाचा पाडण्यासाठी मी त्याच ठिकाणी होतो, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढेच नव्हे तर रथयात्रेत सहभागी झालो म्हणून 18 दिवस जेलमध्ये होतो, असेही त्यांनी सांगितले.

भाजपच्या सभेत बोलताना फडणवीस यांनी बाबरीसाठी आम्ही लाठी, गोळी खाण्याचे काम केले असे सांगितले. बाबरी पाडताना तेथे एकही शिवसेना नेता, शिवसैनिक हजर नव्हता, असे फडणवीस म्हणाले. आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही, अनुशासन तोडता येत नाही म्हणून आम्ही तेथे होतो हे आजपर्यंत कुणाला सांगितले नाही, असे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. बाबरी पाडल्यानंतर सगळय़ांनी मिळून बैठक घेऊन ठरवले की कुणी एकाने श्रेय घ्यायचे नाही. म्हणूनच भाजप नेते कारसेवकांनी बाबरी पाडली असे सांगतात, असेही फडणवीस म्हणाले.

पाकिस्तानला दाखवण्यासाठी मेहबुबासोबत गेलो
मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपचे सरकार स्थापन केले. यावरून टीका होत असताना फडणवीस यांनी मात्र पाकिस्तानला दाखवण्यासाठी मेहबुबासोबत गेलो असे सांगितले आहे. मेहबुबासोबत सरकार स्थापन करून भाजपने पाकिस्तानला दाखवून दिले की, कश्मीरमध्ये सरकार स्थापन होऊ शकते. म्हणूनच आम्ही मेहबुबासोबत सरकार स्थापन केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.