
किरकोळ वादातून ज्युस सेंटर मालकासह कामगारावर हातोड्याने वार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. पसार झाल्यानंतर आरोपीने ओळख पटू नये यासाठी दुचाकीच्या नंबर प्लेटवर खाडाखोड केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्याशिवाय त्याने तोंडाला रुमाल बांधत डोक्यावर टोपी घालून पोलिसांपासून लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवाजीनगर पोलीसांच्या चाणाक्ष नजरेतून तो लपू शकला नाही.
बालाजी शंकर बनसोडे (वय 36, सध्या रा. कर्वेनगर, मुळ रा. सोलापूर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. हेमंत कणसे (वय 35) असे जखमी ज्यूस सेंटर मालकाचे नाव आहे. शिवाजी पुलाखाली हेमंत यांचे स्वामी समर्थ ज्युस सेंटर आहे. मागील आठवड्यात हल्लेखोराने हेमंत यांना हातोड्याने मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या कामगार दीपक सोळंके यांच्याही दंडावर मारहाण करून जखमी केले होते.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी परिसरातील 350 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांना एका दुचाकीचा क्रमांक मिळाला. त्याआधारे शोध घेत दुचाकीच्या नंबरमध्ये खाडाखोड केल्याचे पोलिसांना आढळून आले. संबंधित हल्लेखोर कर्वेनगरमधील हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती पोलीस हवालदार अतुल साठे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
हटकल्यामुळे केला हल्ला
चौकशीत बालाजी बनसोडे सोलापूरमधील सराईत गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वी कामानिमित्त तो पुण्यात आल्याचे निष्पन्न झाले. शिवाजीनगर परिसरातील दुकानाबाहेर तो दिवसभर बसत असे. त्यावेळी हेमंत यांनी त्याला हटकले होते. त्याच वादातून त्याने दोघांवर हल्ला केल्याची कबुली दिली.




























































