करवीरनिवासिनी श्रीअंबाबाईचा दोलोत्सव संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्षयतृतीयेच्या निमित्ताने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दोलोत्सव संपन्न झाला. अक्षयतृतीयेनिमित्त श्रीअंबाबाईची हिंदोळ्यावर म्हणजेच झोपाळ्यावरील विशेष उत्सव पूजा करण्यात आली.

अक्षय्य तृतीयेला करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात दोलोत्सव करण्यात येतो. यावेळी देवी रजत सिंहासनाधिष्ठित झोपाळ्यावर आरूढ होऊन, गौरीप्रमाणे झोके घेते. मध्यान्ह आणि सुर्यास्ताच्या पुर्वसमयी चोपदारांच्या ललकारीने, हवालदार, रोशनाईक आदी मानकरी तसेच सनई-ताशा अशा मंगल वाद्यांसह देवीची उत्सवमूर्ती गर्भगृहातुन गरुड मंडपात रजत सिंहासनाधिष्ठित हिंदोळ्यावर विराजमान झाल्यानंतर उत्सवमूर्तीची विविध वस्त्र-अलंकारयुक्त पुजा बांधली जाते. सोबत चौऱ्या,मोर्चेल,अब्दागिरीसुध्दा विराजमान होतात.

विविध पाना-फुलांनी झोपाळा आणि गरुड मंडप सजवला जातो. यानंतर चोपदारांच्या ललकारीने देवीचा दोलोत्सव सुरु होतो. चोपदार देवीला अखंड झोके देत असतात. करवीरातील सुहासिनी देवीला हळद-कुंकू व इतर सौभाग्य अलंकार प्रदान करण्यासाठी येथे आवर्जुन हजेरी लावतात. कैरीचे पन्हे आणि आंबेडाळ सर्वांना देण्याची रेलचेल सुरू असते.रात्री आठच्या सुमारास उत्सवमूर्ती चोपदारांच्या ललकारीने पुन्हा गर्भगृहाकडे प्रस्थान केली जाते. नेहमीप्रमाणे शेजारती होऊन दोलोत्सव संपन्न होतो.