
मुंबईतील सर्व दुकाने, आस्थापने आणि कार्यालयांवर मराठी भाषेत ठळकपणे नामफलक लावण्यासाठी आता फक्त 13 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. कारण 17 मेपासून पालिकेच्या माध्यमांतून सर्व 24 वॉर्डमध्ये इन्स्पेक्टरचा समावेश असलेल्या तीन जणांच्या पथकाकडून झाडाझडती घेतली जाणार आहे. यावेळी मराठी भाषेत नामफलक नसल्यास रोख दंड किंवा न्यायालयीन कारवाई सुरू केली जाणार आहे. पालिकेच्या या मोहिमेत पाच लाख दुकाने, आस्थापने पालिकेच्या रडारवर राहणार आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च 2022 ला दुकाने, आस्थापने आणि कार्यालयांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 2018 च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाटय़ा असणे बंधनकारक होते; मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱयांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून 17 मेपासून तपासणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
अशी कार्यवाही करा
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 ‘क’ (1)च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे.
या निर्णयानुसार मराठी भाषेतील नावाचा फलक ठळकपणे लावावा. फलकावर इतर भाषेचा समावेश असल्यास ही अक्षरे मराठी भाषेपेक्षा मोठी नसावीत. शिवाय मद्यविक्रेत्या दुकानांसाठी नियमावलीनुसार आता महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत.
अशी होणार कारवाई
पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक असेल. यामध्ये एक इन्स्पेक्टर आणि दोन अधिकाऱयांचाही समावेश असेल.
पाहणीप्रसंगी मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल. न्यायालयीन कारवाई नको असल्यास दंड भरावा लागेल. यामध्ये एका कामगारामागे एक हजार किंवा कायद्यातील दंडाच्या तरतुदीप्रमाणे दंड आकारण्यात येईल.






























































