‘खान’ आडनाव अडचणीचं ठरतंय म्हणून मुलांची आडनावंच बदलली; सरोदवादक उस्ताद अमजद अली यांची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या युगात ‘खान’ आडनाव असणे हा गुन्हा आहे. परदेशात तर बऱयाच वेळा ‘खान’ आडनाव अडचणीचे ठरतेय म्हणून माझ्या पत्नीने आमच्या मुलांचे आडनावच बदलून टाकले, अशी खंत प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत सरोदवादक उस्ताद अमजद अली यांनी खान या आडनावामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, खान या मुस्लिम नावामुळे आपल्याला यूकेचा व्हिसा नाकारला गेला. यामुळे मी खूप निराश झालो. मलाही आपले नाव बदलून सरोद ठेवावे असे वाटत आहे.

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ‘9/11’ च्या हल्ल्यानंतर मुस्लिमांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. ‘9/11’ नंतर ‘मिस्टर खान’ म्हणून परदेशात गेल्यावर तपासायचे. आजच्या काळात ‘खान’ आडनाव असणे हा गुन्हा झाला आहे. म्हणून जेव्हा माझी मुले अमान आणि अयान यांचा जन्म झाला तेव्हा माझ्या पत्नीने खान हे आडनाव बदलून ‘बंगश’ हे आमच्या पूर्वजांचे आडनाव त्यांना लावले असल्याचे त्यांनी सांगितले.

अमजद अली खान म्हणाले, एकविसाव्या शतकात सर्वकाही शांततेत होईल असे वाटत होते. शिक्षणाने माणसे शहाणी होतात असे म्हटले जाते, पण शाळा हा व्यवसाय बनला आहे. कदाचित त्यामुळेच शिक्षण आपल्याला दयाळू बनवू शकले नाही. आजही धर्म आणि रंगाच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव केला जातो. जगातील लोक दयाळू होण्याऐवजी आता अधिक निर्दयी झाले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

परदेशातील लोकांच्या मनःशांतीसाठी सूटबूट घालतो

आता जगभरातून कोणतीही खान व्यक्ती अमेरिकेत किंवा परदेशात इतर कुठेही गेली तर त्यांची अधिक तपासणी केली जाते. आमच्या बाबतीत असे फारसे काही घडले नसले तरी तेथील लोकांच्या मनःशांतीसाठी आम्ही सूटबूट घालतो, असे अमजद अली खान म्हणाले.