
खटाव तालुक्यातील मायणी येथील मागासवर्गीय समाजातील मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून बोगस दस्तावेज तयार करून त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूकप्रकरणी ऍट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुह्यात अटकपूर्व जामिन अर्जावरील सुनावणी अन्य न्यायालयात घेण्यासाठीचा भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आता ही सुनावणी वडूज न्यायालयातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मायणी येथील भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून जमिनीचे बोगस दस्तावेज तयार करण्यात आले. भिसे कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्याआधारे त्यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, फसवणूकप्रकरणी भिसे यांच्या नावाने सह्या करणाऱया संजय काटकरला पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, जयकुमार गोरे यांच्या वतीने त्यांचे वकील संदेश गुंडगे यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांसमोर अर्ज सादर करून अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाऐवजी इतरत्र घेण्याची मागणी केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत आमदार गोरेंचे वकील संदेश गुंडगे, जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी आणि फिर्यादीचे वकील टी. एस. माळी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांनी गोरेंचा अर्ज फेटाळला.
























































