आभाळमाया – उपग्रह निरीक्षण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> [email protected]

या वर्षी कोविड लाट ओसरल्याने रात्रभराच्या आकाशदर्शनाची संधी मिळाली खरी. पण धुळीची वादळं, अवकाळी पाऊस अशा ‘क्लायमेट चेंज’च्या प्रकोपाने अनेकदा आकाशदर्शनाचा बेत रद्द करावा लागला. दुर्बिण घेऊन शहरी भागापासून दूर कुठेतरी जावं आणि आकाश बघता बघता ढगाळ व्हावं असं हल्ली बऱयाचदा घडतंय. त्याला आपला नाइलाज आहे. त्यावर उपाय म्हणजे ढगांवर जाणाऱया विमानातून आकाशदर्शन करणे. पण ते सर्वसामान्यांना अशक्य. शिवाय त्यात समूहाने आकाशदर्शन ‘सोहळा’ अनुभवण्याची मौजही नाही.

गेले अनेक आठवडे आपण विविध अवकाश मोहिमा आणि अगदी स्पुतनिक-1पासून ते नेपच्युनपलीकडे गेलेल्या व्हॉएजरपर्यंतची थोडक्यात माहिती घेत होतो. आता आकाश निरीक्षणाचा मोसम महिनाभरात संपण्यापूर्वी नुसत्या डोळय़ांनी दिसू शकणाऱया कृत्रिम उपग्रहांविषयी माहिती घेऊ.

आतापर्यंत सर्व देशांनी मिळून 6500पेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवलेत. त्यात आपलेही 118 आहेत. या सुमारे साडेसहा हजार कृत्रिम उपग्रहांपैकी साधारण 3400 कार्यरत (ऑक्टिव्ह) असून जवळपास तीन हजार निकामी होऊन पृथ्वीभोवती गरगरतायत. त्यातलाच एखादा केव्हातरी गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचला जातो आणि क्वचित त्याचे अवशेष सापडतात. पृथ्वीकडे आकर्षित होणारे निकामी, कृत्रिम उपग्रह बहुतेक वेळा जळून खाक होतात पिंवा समुद्रात वा जंगलात त्यांचे अवशेष पडतात. पण काही वेळा भर वस्तीतही ते पडू शकतात. अलीकडेच महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्हय़ात असे जळते अवशेष कोसळण्याची दृश्यं व्हायरल झालेली तुम्ही पाहिली असतील. त्यानंतर सापडलेल्या अवशेषांचा वैज्ञानिक तपास सुरू आहे.

कृत्रिम उपग्रहांपैकी 95 टक्क्यांपेक्षा अधिक उपग्रह हे पृथ्वीभोवती जवळच्या म्हणजे 300 ते 400 किलोमीटर अंतरावरून फिरणारे असतात. रिमोट सेन्सिंग किंवा शेतकी पाहणी वगैरेंसाठीचे उपग्रह जवळून फिरत त्या त्या भूभागाचे पह्टो घेतात. पृथ्वीभोवती सुमारे 90 मिनिटांत फेरी मारणाऱया उपग्रहांची आपल्या देशाच्या भूभागावर येण्याची वेळ संशोधकांना ठाऊक असते. त्यानुसार वेळेचं गणित अचूक मांडून त्यांचे कार्य चालते.

यापैकी बहुतेक सॅटेलाईट्स हे पोलर ऑर्बिट म्हणजे पृथ्वीच्या उत्तर-दक्षिण ध्रुवांवरून ‘ध्रुवीय कक्षेत फिरतात. तेव्हा आपल्या देशाच्या लॉन्जिटय़ूड किंवा रेखांशानुसार त्यांची कार्यरत राहण्याची वेळ निश्चित केली जाते.

यापेक्षा वेगळे म्हणजे ‘जिओस्टेशनरी’ किंवा ‘जिओ सिंक्रोनस’ कृत्रिम उपग्रह पृथ्वीपासून अवकाशात बरेच दूर म्हणजे सुमारे 36800 किलोमीटरवर असतात. त्यामुळे त्यांचा फिरण्याचा वेग आणि पृथ्वीचा फिरण्याचा वेग तंतोतंत जुळतो आणि तो उपग्रह विशिष्ट भूभागावर ‘स्थिर’ असल्यासारखा परिणाम करतो. म्हणूनच त्याला ‘भूस्थिर’ कृत्रिम उपग्रह म्हणतात. हिंदुस्थानचेही भूस्थिर उपग्रह सध्या कार्यरत आहेत. एक भूस्थिर उपग्रह (दूरवर असल्याने) पृथ्वीचा सुमारे 42 टक्के भाग ‘पाहू’ शकतो. त्यामुळे असे तीनच उपग्रह संपूर्ण पृथ्वीवरच्या गोष्टींची नोंद घेऊ शकतात अथवा त्या भागात दूरसंदेशवहन तसंच दूरचित्रवाणी यासाठी अव्याहत काम करतात. भूस्थिर उपग्रह असल्यावर संपर्कासाठी तो उपलब्ध नाही असं कधीच होत नाही. हिंदुस्थान पुढच्या काळात असे आणखी 14 उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. पृथ्वीपासून 240 किलोमीटरवरून फिरणारं ‘आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन’ मात्र रात्रीच्या आकाशात वेळ साधली तरच ठळकपणे दिसतं.

एरवी सुमारे 100 कृत्रिम उपग्रह सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी सुमारे तासभर दिसू शकतात. कारण पृथ्वीवरून सूर्य मावळला पिंवा उगवायचा असला तरी दूरस्थ उपग्रहांवर त्याचा प्रकाश पडत असल्याने ते आपल्याला दिसू शकतात. आकाश निरीक्षणाच्या पहिल्या सत्रात आम्ही प्रेक्षकांना आकाशाकडे लक्ष ठेवायला सांगतो. या वेळी अनेक कृत्रिम उपग्रह चमचमत्या ठिपक्यासारखे इकडून तिकडे जाताना दिसतात. आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पहायचं असेल तर मात्र ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागेल. कारण अनेकदा आपल्या दिवसाच्या काळात ते अवकाशातून पसार होतं. तीच गत इतर उपग्रहांची. संध्याकाळी जास्तीत जास्त कृत्रिम उपग्रह ‘शोधण्याची’ स्पर्धा मनोरंजक आणि ज्ञानवर्धक असते. हा महिना त्यासाठी शेवटचा. जूनमध्ये क्वचितच निरभ्र आकाश दिसेल.