शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर संगीतमय नाटक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
देशाच्या स्वातंत्र्य लढय़ामध्ये बलिदान देणाऱ्या सरदार शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांच्या जीवनावर तसेच स्वातंत्र्यपूर्व देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य करणारे ‘गगन दमामा बाज्यो’ हे नाटक पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.
शंतनू पाटील दिग्दर्शित आणि काफिला निर्मित या दोन अंकी मराठी सांगीतिक नाटकाचा प्रयोग उद्या 8 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात होणार आहे.
देशासाठी फासावर गेलेला वीर यापलीकडे जिवलग मित्र, मुलगा, प्रियकर आणि एक बुद्धिजीवी क्रांतिकारक या रूपात सरदार भगतसिंग आपल्या समोर येतात. भगतसिंग यांची देशाविषयी असणारी आधुनिक समाजवादी भूमिका व विचार आणि जातीयता, धर्मांधता, गरिबी, बेरोजगारी, परस्परद्वेषाने ग्रस्त झालेल्या स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानच्या सद्यस्थितीचा आढावा हे नाटक घेते. आशयासोबत संगीत हा या नाटकाचा आत्मा असून ऋषिकेश देशमाने नाटकाचे संगीतकार आहेत.
ज्येष्ठ रंगकर्मी पीयूष मिश्रा यांच्या लेखणीतून साकारलेले हे नाटक आशयाला धक्का न लावता मराठीत आणले आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना 30-35 तरुणांना एकत्र घेऊन  राज्यभरात 15 प्रयोग त्यांनी केले. मुंबईतील हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे.