काव्यधारा; वर्तुळ पूर्ण होईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नीती मेहेंदळे

योगिनी राऊळ या स्त्रीवादी विचारधारणा असलेल्या कवयित्री.  त्यांच्या कवितेला स्त्रीविषयक तसेच सामाजिक चळवळीची शुद्ध जाणीव लाभलेली आहे. आदिम काळातील अगम्य चिन्हांची भाषा आज एकेक पायरी चढत आहे. याच भाषेची अनेक रूपं उलगडणाऱया ‘गोल गोल भाषा’ या त्यांच्या कवितेचा हा रसास्वाद.

साहित्य साहित्य म्हणत शब्दांची भेंडोळी एकमेकांवर उडवली जातात तेव्हा प्रमाण भाषा हीच का? आमची पण प्रमाण भाषा, हे कोण ठरवणारे प्रमाण भाषा? म्हणत बाणांवर बाण सोडणारे इच्छुक प्रमाणभाषीय तंटाळू लोक भाषेचा सावळागोंधळ घालतात तेव्हा आपली आपली बोलीभाषा बोलत आयुष्य सुखेनैव घालवलेल्या बायाबापडय़ांना लादलेली जाडजूड शब्दांची अवडंबरं पेलेनाशी होतात तेव्हा,  लहान लहान मुलं आपली आईची, वडिलांची भाषा समजायच्या आधीच परकी भाषा जवळ करू लागतात तेव्हा, भाषा – भाषा, शब्द – शब्द स्पर्धेच्या रिंगणात उतरलेले दिसतात तेव्हा,

तेव्हा…

मला आठवतो तो आदिमानव,

माकडापासून सुधारित आवृत्ती होऊ लागलेला,

निरागसत्व अगदी नैसर्गिक मिळालेला,

भटकं आयुष्य स्वीकारलेला,

शब्दांच्या कवचकुंडलांपासून पूर्ण मुक्त,

काहीशा खाणाखुणा करत, वेगवेगळे आवाज काढून भाव जवळच्यांना पोहोचवू शकणारा,

वस्त्रचंही फार चिकित्सक स्वरूप नसायचं त्या युगातला,

गुहांमध्ये वास्तव्य करणारा… म्हणजे पुराश्मयुगीन असेल कदाचित,

दगडांची हत्यारं स्वतः बनवणारा, आपलं अन्न आपणच मिळवणारा, साधंसुधं खाणारा एकदम स्वयंपूर्ण, सिंधू संस्कृतीसारखी कुणालाही न उलगडलेली अगम्य चिन्हांची भाषा जाणणारा,

अगम्य कोणाला? तुम्हाला आम्हाला.

तो अतिशय सुखी असणार त्याच्या आदिम आयुष्यात, उंट, हत्ती, घोडा, मगर, माकड, त्रिकोण, चौकोन, काय काय सचित्र लिप्यांमध्ये कोरून मोकळा होत असेल मनातली वादळं… मनातले सगळे निरोप… थोडक्यात.

गुहांच्या भिंती दिसतात ना कोरलेल्या त्या भीमबेटकाला नाहीतर आपल्या कातळशिल्पांतून, तशाच.

केवढा तो साधेपणा. कसलाही गर्व नाही की आत्मप्रौढीचा लवलेश नाही. बरं कोणासाठी कोरायचं हे सगळं? भिंतीवर, लाकडी पट्टय़ांवर, पानांवर, फार तर नंतर वस्त्र आली, कागद आला. याचं लिखाण सगळं मोजकं.

गुहेत नाही जो त्याच्यासाठी फक्त किंवा गुहा सोडताना पुढच्या टोळीला संदेश असेल कदाचित. बस्स.

छाती पिटून दणके नाही वाजवलेले दिसत… माझी ही प्रमाण भाषा, बोलीभाषा असले.

आपलं काम बरं आपण बरं.

वाटतं, गुहेत होता तोच बरा होता.

त्याची शरीराची, मनाची प्रगती झाली खरी पण भाषा एकेक पायरी वर चढत गेली तसतसा तो अधिक ताठ, गर्विष्ठ होत गेला.

अमर्याद होत गेला काहीसा.

त्याच्या ठायीची निर्व्याजता, नम्रता आटत गेलीसं भय वाटतं.

त्याने एकदा स्थिरचित्त होऊन आत्मपरीक्षण करावं.

एकदा पुन्हा आदिम चिन्हं जुन्या छायाचित्रांसारखी पालटून पाहावीत.

काय दिसेल?

त्याला त्याची ओळख नव्याने होईल, उगमाचं भान येईल. काय मागे उगीच सोडलं त्याची जाणीव होईल.

नवं काही अट्टहासाने धरलेलं सोडायची शक्ती येईल.

माणूस थोडा मऊ होईल, कदाचित,

थोडा वाकेल. नम्रतेचं झाड वाकलेलंच असतं तसा.

तीच त्याची नवीन भाषा असेल. नव्या जुन्याचा संगम असेल.

गोल भाषा.

एक वर्तुळ पूर्ण होईल.

खरेच!

मूळ कविता

गोल गोल भाषा

आदिमानव नव्हता म्हणत

सूर्याला सूर्य,

बैलाला बैल,

माणसाला माणूस,

नव्हता करत उच्चारांचे निरर्थक उरूस!

विचारांना नव्हता घालत वेलबुट्टय़ांचे अलंकार,

प्राण्यांना नव्हता देत देवाचे आकार!

तो फक्त कवेत घेई दिसणारा भवताल

त्रिकोण आणि रेषांतून पकडत जाई दिक्काल

डोळय़ांनी टिपलेलं उपसत राही बोटांतून

काहीबाही चित्कारत राही ओठांतून, पोटातून

पानावर, लाकडावर,

कापडावर, कागदावर

रितारिता झाला माणूस गुहेबाहेर पडल्यावर

शब्दा – शब्दात अडकत गेला

उगाच राठ – ताठ झाला,

 भाषेमध्ये गुंतत गेला

शहाणा – शहाणा झाल्यावर

तीच बोटं, त्याच भावना

तोच माणूस, त्याच खुणा

तेच वाद, त्याच सूचना

वाकव तुझा ताठ कणा

झडव तुझं कान-नाक

सगळ्याभोवती गोल आख

गोलामध्ये फिरत रहा

गुहेमध्ये परत जा

मधूनच दडव

दोन-चार पाखरं उडव

डोळे वटार अधून-मधून

ठेंगा दाखव जाणून- बुजून

माणसा… माणसा… माकड हो

वळवून टाक सरळ रेषा

पुन्हा एकवार वापरून बघ

सपाट चिन्हांची आदिम भाषा!

काव्यसंग्रह ः मुखवटा उतरवल्यावर

कवयित्री ः योगिनी राऊळ