
रात्रीच्या वेळी डीजे वाजवणाऱ्या आरोपीने त्याला थांबवणाऱ्या पोलिसाचा चावा घेतल्याची घटना ठाणे येथे घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री साडे बारा वाजता पोलिसांचं एक पथक गस्तीवर असताना त्यांना महाले रुग्णालयामागील हरिनिवास सर्कलजवळ मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याचं आढळलं. तिथे उपस्थित असलेल्यांपैकी काहींना पोलिसांनी याबाबत प्रश्न विचारले.
पण, त्यांची उत्तरं न देता त्यातील एकाने पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याने त्याच भरात त्याचं डोकं पोलिसांच्या गाडीच्या काचेवर मारलं. जर पोलिसांनी या कार्यक्रमात अडथळा आणला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकीही त्याने दिली.
त्यातील एका पोलिसाने त्याला थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पोलिसाच्या हाताचा चावा घेऊन त्याला जखमी केलं. त्याचसोबत अजून दोन पोलिसांना धक्काही मारला. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला बेड्या ठोकल्या. त्याचं नाव आमीर खान असं असून तो किसान नगर झोपडपट्टीत राहतो.





























































