पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरचे अनुकरण करतात – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरला फॉलो करत असून हिटलर आणि त्यांच्या प्रचारात साम्य आहे. मोदीही हिटलरप्रमाणे अनेक इव्हेंट करतात. हिटलरच्या काळातही विरोधकांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले होते, तसेच आता होत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईतल्या परळमध्ये सोशल मिडीया मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली.

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या जेलमध्ये जाणारच, असेही राऊत यांनी सांगितले. सुशांतसिंग प्रकरण, कंगना राणावत प्रकरण तसेच शिवसेनेवर केलेले खोटे आरोप यात सोशल मिडीयाचा वापर झाला. ही हिटलरची प्रचारनीती आहे. 100 वेळा खोटे बोला, जनतेला तेच खरे वाटू लागते. आज राज्यात तेच सुरू आहे. शिवसेनेवर अनेक खोटे आरोप करण्यात येत आहेत. काही लोकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर आरोप करण्याचे काम दिले आहे. त्यांना पैसे कोण देते, हे जनतेला माहित आहे, असेही ते म्हणाले. भाजपशी संबधित उद्योगपतींकडून यांना पैसे मिळथ असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गरम रक्ताची पिढी राजकारणात आणली. बाळासाहेबांची शिवसेना हार मानणारी नाही, गुडगे टेकणार नाही. ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे, अशी शिवसेना असल्याचेही ते म्हणाले. शिवसेना हा देशातील राजकारणाचा सर्वात मोठा ब्रँड असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील सर्व भाषांमध्ये अनुवाद होणारे सामना हे एकमेव वृत्तपत्र आहे, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढणे सोपे नसल्याचेही त्यांनी विरोधकांना ठणकावले. शिवसेनेने हे राज्य भाजपकडून खेचून घेतले आहे. तुम्हा नैतिकता पाळणार नसाल, तर मलाही कोथळा काढण्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी विरोधकांना ठणकावले.