
कोरोनाकाळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामाची नोंद राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. विविध जनमत चाचण्यांमध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा गौरव झाला आहे. त्यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. त्यातून महाराष्ट्राच्या बदनामीसाठी मुंबईवर, शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले केले जात असल्याचा हल्लाबोल शिवसेना उपनेते व सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केला आहे.
‘शिवसंपर्क अभियाना’च्या नियोजनासाठी सातारा येथे आयोजित केलेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱयांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव,यशवंत घाडगे, जयवंतराव शेलार, महिला आघाडीच्या शारदा जाधव, अनिता शिंदे, छाया शिंदे यांच्यासह जिल्हा उपप्रमुख, तालुकाप्रमुख, तालुका उपप्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बानुगडे म्हणाले, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसाठी खड्डे खणले तेच त्या खड्डय़ात गाडले गेल्याचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडावी, राष्ट्रपती राजवट लागावी, यासाठी विरोधकांकडून कुरापती सुरू आहेत. त्यांच्याकडून सध्या ज्या पद्धतीने हल्ले सुरू आहेत, त्यामुळे शिवसैनिकांचे रक्त पेटून उठत आहे. परंतु पक्षप्रमुखांनी संयम ठेवण्यास सांगितले आहे. आपण त्यांना कामातून उत्तर देऊ, असे त्यांचे म्हणणे आहे. या कामगिरीच्या जोरावर आगामी निवडणुकीत जनताच त्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वास बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी म्हणून आपण तीन पक्ष सोबत असलो तरी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर ताकदीने लढवण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यावर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, यशवंत घाडगे, जयवंतराव शेलार यांची भाषणे झाली. जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हणमंतराव चवरे यांचा सत्कार करण्यात आला.




























































