
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांचा विकास या योजनेंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पहिलेच इनडोअर स्टेडियम उभारण्यात येत आहे. यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राज्यातील महानगरपालिकांना मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्याच्या कामासाठी अनुदान देण्यात येते. याअंतर्गत कोल्हापूर मनपासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, याबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे. या स्टेडियमच्या माध्यमातून क्रीडा, संस्कृती जोपासत खेळाडू आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. येथील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या इनडोअर स्टेडियममुळे खेळाडूंना सराव करण्यासाठी अधिकची जागा मिळणार आहे.
महाविकास आघाडी सरकार राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूरवासीयांकडून सतेज पाटील यांच्याकडून आभारही व्यक्त करण्यात आले. यावेळी आमदार जयश्री जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते.




























































