
परळ येथे राहणारी आणि मूळची वेंगुर्ल्याची असणारी मुग्धा रेडकर वैमानिक झाली आहे. मुग्धा न्युझीलंडमधील ऑकलंड येथील स्कूलमधून व्यावसायिक वैमानिक परवान्यासाठी आवश्यक असलेली सीपीएलची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाली आहे. वयाच्या 18 व्या वर्षी परदेशात जाऊन वैमानिक प्रशिक्षणाचा तिचा प्रवास सुरू झाला होता. तिच्या मेहनतीला आणि चिकाटीला अखेर यश आले आहे. सध्या ती प्रशिक्षण पूर्ण करून मायदेशी परतली आहे.
मुग्धाचे वडील दिनेश रेडकर आणि आई दिव्यश्री यांनी लेकीच्या वैमानिक होण्याच्या स्वप्नाला बळ दिले, प्रोत्साहन दिले. दिनेश रेडकर हे मोटरमन आहेत. मुग्धाचे शालेय शिक्षण सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल, दादर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण महर्षी दयानंद महाविद्यालय परळ येथे झाले. वयाच्या सातव्या वर्षापासून ती भरतनाटय़म शिकली. तिने पोहण्याचे प्रशिक्षण घेतले. मुग्धाने सी लिंक शिडाची नौका चालवण्याचे प्रशिक्षणही घेतले.
मेहनत आणि चिकाटीला यश
मुग्धाचे वैमानिक प्रशिक्षण 7 फेब्रुवारी 2018 रोजी मिडल अर्थ फ्लाईंग स्कूल ट्रेडिंग अॅज न्यूझीलँड एव्हिएशन, माटामाटा या शिक्षण संस्थेत सुरू झाले. सुरुवातीपासूनच प्रशिक्षणीदरम्यान व्हिसा अटीनुसार ती नोकरी करत होती व स्वतःचा मासिक खर्च स्वतः भागवत होती. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊन 26 एप्रिल 2019 रोजी मुग्धाला पीपीएल म्हणजेच खासगी वैमानिक परवाना मिळाला. जुलै 2019 रोजी ती सीपीएल म्हणजे व्यावसायिक वैमानिक परवान्यासाठीची लिखित परीक्षा उत्तीर्ण झाली आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तिची नोंदणी झाली. पुढे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे ते स्कूल बंद झाले आणि सर्व विद्यार्थ्यांना ऑकलँडच्या दुसऱया स्कूलमध्ये पाठवण्यात आले. त्यामुळे पुन्हा नवीन व्हिसा बनवणे. पुन्हा नव्या स्कूलमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी नाव नोंदवणे, कोरोनाचे संकट अशा अडचणींचा सामना करत मुग्धाची 27 एप्रिल 2022 रोजी प्रात्यक्षिक परीक्षा झाली आणि त्यात उत्तीर्ण होऊन तिला व्यावसायिक वैमानिक परवाना मिळाला आहे.
पहिल्यांदा पाचवीत असताना मी बंगळुरूला फ्लाईटने गेले होते. तेव्हापासून गगनभरारीचे वेध लागले. माझे वडील मोटरमन असल्यामुळे मलाही उड्डाण करावं असं वाटू लागलं. त्यानुसार मी वाटचाल सुरू ठेवली. आईबाबांचे खूप प्रोत्साहन मिळाले.
मुग्धा रेडकर























































