पंजाब पोलिसांच्या गुप्तचर शाखेच्या मुख्यालयावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब पोलिसांच्या गुप्तचर शाखेच्या मोहाली येथील मुख्यालयावर सोमवारी रात्री हल्ला झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मुख्यालयाच्या इमारतीवर हॅण्ड ग्रेनेड किंवा रॉकेटने हल्ला करण्यात आल्याची शक्यता असून या घटनेची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या हल्ल्यात मुख्यालयासह आसपासच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे.

हल्ल्यानंतर मुख्यालयाच्या पुढील भागात मोठा स्फोट झाला. यात कार्यालयाच्या काचा फुटल्या. इमारतीवर दूरवरून स्फोटक पदार्थ फेकण्यात आल्याचा संशय प्राथमिक चौकशीदरम्यान वर्तवला गेला आहे. सध्या पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांनाही मुख्यालयापासून दूर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. गुप्तचर शाखा मुख्यालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच चंदिगढच्या बुडैल तुरुंगाबाहेर बॉम्ब सापडला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातील पोलीस ठाण्यांसह इतर सरकारी विभागांना हाय अॅलर्ट जारी करण्यात आला होता.