
”हल्ली अनेकांना हिंदुत्वाच्या उचक्या लागत आहेत. हिंदुत्व म्हणजे काय, धर्म म्हणजे काय हे आम्हाला शिकवत आहेत. हिंदुत्व ही शिकण्याची गोष्ट आहे का? ते रक्तातच असावे लागते, असा घणाघात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. ‘रघुकुल रीत सदा चली आयी, प्राण जाए पर वचन न जाये’ या उक्तीप्रमाणे आम्ही सेवा धर्माला जागून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
नांदेड जिल्ह्यात वाडी येथे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. या रुग्णालयाचे भूमिपूजन मंगळवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यसेवा अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोनाकाळात महाविकास आघाडी सरकारने गाजवलेल्या कर्र्तबगारीचे देशभर कौतुक होत आहे. याच जाणिवेतून हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर सहा महिन्यांनी आपण येणार असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची माहिती देतानाच विकासाचा हा धडाका यापुढेही असाच चालू राहणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
शिवसेनेने नेहमीच समाजकारणाला प्राधान्य दिले. दुष्काळाच्या अतिशय कठीण काळात युवा सेनेने चारा, पाण्याची सोय केली. जनावरांसाठी छावण्या उघडल्या, टँकर लावून तहान भागवली. समाजकारणाचा हा वसा असाच अविरत चालू राहणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.































































