
फरासखाना आणि खडक पोलिस ठाण्यातंर्गत परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या घिसाडी टोळीतील अट्टल गुन्हेगारावर एपीडीएनुसार कारवाई करण्यात आली ओह. त्याला एक वर्षांसाठी संभाजीनगर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेली ही 64वी कारवाई आहे. संदीप कमलाकर चव्हाण (वय 42, रा गणेश पेठ) असे स्थानबद्ध केलेल्याचे नाव आहे.
फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार संदीप चव्हाण याने साथीदारांच्या मदतीन कोयता, पालघन, चाकू, गुप्ती यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, विनयभंग, सरकारी कामात अडथळा करणे, दंगा, यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याला स्थानबद्ध करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार चव्हाण याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.
64 सराईत विविध कारागृहात स्थानबद्ध
दहशत माजविणाऱ्या 64 सराईतांना राज्यातील विविध कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी सराईतांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत 64 गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्ध केले आहे.






























































