
>> वैश्विक
युरी गागरीन 1958 मध्ये अंतराळात गेला आणि त्याने पृथ्वीची परिक्रमा कली. अंतराळात किंचित काळ का होईना, पण राहणारा तो पहिला माणूस होता. त्यानंतर खगोल संशोधनात आणि तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती झाली. माणसाचं चंद्रावतरण तर होतंच, पण पुढच्या टप्प्यात मंगळावर वगैरे जायचं असेल तर मध्ये कुठे तरी अंतराळ-निवास शक्य ठरेल का, याची चाचपणी सुरू झाली. तसा भूभाग अजून तरी सापडलेला नाही किंवा असला तरी त्यावर वस्ती करणं अतिखर्चिक ठरणार. याचा अंदाज घेऊनच थेट मंगळावरच काही काळासाठी ‘सहल’ नेण्यासाठी अनेक उद्योजक धडपडत आहेत. येत्या दीड-दोन दशकांत कदाचित मंगळवारी पाहायला मिळेल. धनवान लोक त्याचा अर्थातच आधी लाभ घेतील.
परंतु यापेक्षा अंतराळ निवासाचं आणखी एक महत्त्व म्हणजे, मायक्रोग्रॅव्हिटी किंवा शून्यवत गुरुत्वाकर्षणात राहून अनेक वैज्ञानिक प्रयोग करणे. त्यासाठी बऱ्याच दिवसांचा कालावधी लागणार. तेव्हा एखादा महिना ते वर्षभर अंतराळातच राहण्याची सोय झाली तर असा विचार अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेच्या संशोधकांच्या मनात 1980 मध्येच आला. त्यातच अमेरिका-रशिया अवकाश स्पर्धेची भर पडली. त्या काळात रशियाची याच प्रकारची ‘सॅल्यूत’ मोहीम सुरू होती. त्याला उत्तर म्हणून अमेरिकेने फ्रीडम यान अवकाशात पाठवायचं ठरवलं. पुढे या प्रकल्पात अमेरिकेशी कॅनडा, जपान, युरोप यांनी हातमिळवणी केली.
अवकाश संशोधनात आंतरराष्ट्रीय सहकार्य असावे असाही विचार पुढे आला आणि जागतिक शांततेचे पुरस्कर्ते असलेले अमेरिकेचे भूतपूर्व उपराष्ट्राध्यक्ष अल् गोर यांनी 1993 मध्ये रशियाशी संपर्क साधला. याचा एकत्रित परिणाम होऊन अमेरिकेच्या नासा, रशियाच्या रोकॉस्मॉस, जपानच्या जॅक्झा, कॅनडाची सीएसए आणि युरोपच्या ईएसए या अवकाश संस्थांनी अवकाशातील अंतराळ स्थानकाचा संयुक्त प्रयोग करायचं ठरवलं. रशियाच्या बैकोनूर अंतराळ स्थानकावरून 20 नोव्हेंबर 1998 रोजी त्यांचं यान उडालं आणि अमेरिकेनेही केप केनेडी येथून यानोड्डाण घडवलं. त्यांची अंतराळात जुळणी झाली आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांचा जन्म झाला.
ही घटना अवकाश विज्ञानात फार महत्त्वाची होती. आता थेट अंतराळात राहूनच अंतराळाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करता येणार होता. हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर अवकाशात सुसज्ज अंतराळ स्थानक गेली साडेतेवीस वर्षे, पृथ्वीला 93 मिनिटांत एक परिक्रमा करत फिरतंय. त्यापैकी साडेएकवीस वर्षे तिथे माणसं (अॅक्ट्रॉनॉट) जाऊन राहतायत. हिंदुस्थानी वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी तर अंतराळ स्थानकावर राहण्याचा विक्रम करताना 50 तासांचं स्पेसवॉकसुद्धा केलंय.
सुमारे साडेचार लाख किलो वजनाच्या, 73 मीटर लांबी आणि 109 मीटर रुंदीच्या या अंतराळ स्थानकात मानवी वस्तीला योग्य असं वातावरण तयार केलं आहे. 79 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा सतत होत राहील आणि तिथल्या अंतराळयात्रींना पृथ्वीवर घेतो तसाच श्वास घेता येईल याची व्यवस्था आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम नगण्य झाल्यावर अंतराळात असलेल्या मायक्रोग्रॅव्हिटीचा (सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा) तसंच अंतराळातील एकूण वातावरणाचा म्हणजे अशनी, धूमकेतूंचा परिणाम वगैरेचा अभ्यास करण्याबरोबरच अंतराळात काही वनस्पती, जीवजंतूंची वाढ कशी होऊ शकते यावरही अव्याहत संशोधन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे 2020 पर्यंत 1,31,440 पृथ्वी प्रदक्षिणा केल्या होत्या. आता 93 मिनिटांना एक या हिशेबाने आजच्या (तुम्ही हा लेख वाचत असलेल्या) वेळेपर्यंत किती परिक्रमांची भर पडली त्याचं गणित मांडणं मनोरंजक ठरेल.
आता या स्थानकावरील संशोधनापैकी अमेरिका आणि मित्रांच्या विभागातील सुमारे 76 टक्के डेटा (विदा) अमेरिका, 12 टक्के जपान, 5 टक्के युरोप आणि 2 टक्के कॅनडाकडे जातो. रशियाचे प्रयोग त्याव्यतिरिक्त आहेतच. आजमितीला या स्थानकावर दोन रशियन आणि एक युरोपियन असे अंतराळयात्री कार्यरत आहेत.
अंतराळ स्थानक हा पृथ्वीजवळच्या कक्षेतील (लो अर्थ ऑर्बिटमधला) सर्वात तेजस्वी कृत्रिम उपग्रह आहे. योग्य वेळ ठाऊक असली तर आपल्याला एखाद्या संध्याकाळी किंवा पहाटे काही वेळ त्याचं दर्शन नुसत्या डोळय़ांनाही होतं. 2 नोव्हेंबर 2000 मध्ये या स्थानकावर पहिले रहिवासी आल्यापासून चिकाटीने चालेल्या संशोधनाला आता रशियाच्या भूमिकेमुळे बाधा येईल का, अशी शंका आहे. पुतीन यांनी 2024 पर्यंत यातील सहभाग मागे घेण्याचं ठरवलंय असं म्हणतात. युक्रेनबाबत रशिया एकाकी पडल्याचा फटका अंतराळ संशोधनाला बसू शकतो तो असा.




























































