कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू, 17 मे रोजी प्रसिद्ध होणार अंतिम प्रभागरचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना येत्या 17 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी येत्या 27 जून रोजी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातही राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषदेला तशी सूचना देण्यात आली आहे. एकंदरीत या दोन्ही निवडणुकांचा दिवाळीपूर्वीच राजकीय धुरळा उडणार आहे.

महापालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली असून, कोरोना संसर्गामुळे निवडणूक दोन वेळा पुढे ढकलावी लागली होती. त्यात पूर्वीची एक सदस्य प्रभागरचना रद्द करून राज्य शासनाने त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय घेतल्याने सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागली. त्यामुळे लोकसंख्येनुसार पूर्वीच्या 77 प्रभाग आणि स्वीकृत पाचसह 81 नगरसेवक असलेल्या या महापालिकेत आता तीन नगरसेवकांचा एक याप्रमाणे 30 प्रभाग व दोन प्रभागांसाठी एक अशा एकूण 92 नगरसेवकांची संख्या असणार आहे.

आरक्षण सोडत महिनाअखेरीस

महापालिकेसाठी प्रभागरचना 17 मे रोजी अंतिम होणार असून, त्यानंतर पुढील टप्प्यात असलेली आरक्षण सोडतही या महिनाअखेरीस काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे, ओबीसीशिवाय प्रथमच आरक्षण सोडत होत असून, यामध्ये 79 प्रभाग खुले, 12 प्रभाग अनुसूचित जाती आणि एक प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहे. या सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के जागांवर महिलांचे आरक्षण असणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदारयादी तयार करणे, त्यावर हरकती व सूचना होऊन अंतिम मतदारयादी झाल्यानंतर मतदान होणार आहे.

झेडपी सदस्यसंख्या नऊने वाढणार

n जिल्हा परिषदेच्या 76, तर प्रभाग समित्यांच्या 152 प्रभागांसाठी ही प्रभागरचना निश्चित केली जाणार असून, यापूर्वी जिल्हा परिषद सभागृहात असलेल्या 67 सदस्यसंख्येत नऊ मतदारसंघांची भर पडून एकूण सदस्यसंख्या 76 होणार आहे. तर, पंचायत समिती सदस्यसंख्या 134वरून 152 होणार आहे.

झेडपी, पंचायत समिती निवडणूक पावसाळ्यानंतरच

n राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात काल मंगळवारी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 27 जून रोजी अंतिम प्रभागरचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत आणि मतदारयादी निश्चित केली जाणार असल्याने कोल्हापूर झेडपीची निवडणूक पावसाळ्यानंतरच पार पडणार आहे. कच्चा आराखडा तयार असला, तरी आता पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असून, 23 मे रोजी प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. 31 मेपर्यंत या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर या प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना 2 जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर, 8 जूनपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे. 22 जून रोजी विभागीय कार्यालयात हरकती व सूचना यावर सुनावणी होऊन जिल्हा परिषद गट आणि गण अंतिम केले जाणार आहेत. त्यानंतर 27 जून रोजी अंतिम रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.