
ऍलोपॅथीची पदवी नसतानाही उपचाराच्या नावाखाली रुग्णाच्या जिवाशी खेळणाऱ्या मुन्नाभाईला चारकोप पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. प्यारे श्रीनारायण भारती असे त्याचे नाव आहे. त्याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती.
मालवणीच्या भाब्रेकर नगर येथील एका एसआरएच्या इमारतीत एक बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्या तक्रारीनंतर पालिकेच्या आर दक्षिण प्रभागाचे डॉ. संदीप बनसोडे यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार यांचे पथक भाब्रेकर नगर येथील एका एसआरएच्या इमारतीत गेले. तेव्हा प्यारे हा रुग्ण तपासत होता. पोलिसांनी प्यारेकडे वैद्यकीय परवान्याबाबत चौकशी केली. प्यारेने 2005 मध्ये नाशिक येथून नॅचरोपॅथीची पदवी घेतली होती. नॅचरोपॅथीची पदवी असताना तो रुग्णांना तपासून तो गोळ्या औषधे देत असायचा. तो रुग्णाकडून 200 रुपये घेत होता. दवाखान्यातून पोलिसांनी स्टेथोस्कोप, इंजेक्शन, गोळय़ा, औषधे पोलिसांनी जप्त केली. फसवणूक केल्याप्रकरणी प्यारेविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
























































