
नगर शहरातील छोटय़ा वसाहतीत अथवा गल्ल्यांमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम झाले आहे. मात्र, आता चक्क शहरातील मुख्य रस्त्यांवरच पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरवासीयांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर चोहोबाजूंनी टीका होत आहे.
नगर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था सध्या सर्वत्रच पाहायला मिळत आहे. रस्ते दर्जेदार व्हावेत म्हणून सातत्याने मागणी होत असते. विशेष म्हणजे 2017 साली मुख्यमंत्री निधीतून दहा कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले. मात्र, आज पाच वर्षे उलटूनही या रस्त्यांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. आता हे खड्डे भरण्याऐवजी त्यावर सर्रास पेव्हर ब्लॉक बसविण्याचा प्रकार सुरू आहे. शहरामध्ये आज अनेक रस्ते झालेले नसून, विविध कामांसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. नगरसेवक वेळोवेळी आवाज उठवतात. मात्र, प्रशासन कोणतीही कारवाई करायला तयार नाही. त्यातच नव्या नावाने आता पाण्यासाठी अथवा गटारीचे काम मार्गी लागण्यासाठी रस्ते खोदले जात आहेत.
नगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या रोशन हॉस्पिटलजवळ एका बाजूने काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा रहदारीचा रस्ता आहे. आता हा रस्ता काँक्रीटचा न करता उरलेल्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविले जात आहेत. अशा पद्धतीने मुख्य रस्त्यावर पेव्हर ब्लॉक कसे बसवले जातात व याला मान्यता कशी मिळते, असा प्रश्न नगरकर विचारत आहेत.
प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नगर शहरातील जनतेला बसत आहे. शहरात पूर्वीही काँक्रीटच्या रस्त्यावरच पेव्हर ब्लॉक बसवल्याची उदाहरणे पण आहेत. आता थेट मुख्य रस्त्यावरच हे पेव्हर ब्लॉक बसविण्याचा घाट घालण्यात आला आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पेव्हर ब्लॉक किती टिकणार, असा प्रश्नही नगरकर विचारत आहेत.





























































