
दोन आठवडय़ांपूर्वी अष्टहजारी शृंखलेतील ‘अन्नपूर्णा-1’ हे 26 हजार 545 फुटांवरील अत्यंत खडतर समजले जाणारे शिखर कमी वयात सर करण्याचा जगातील सर्वांत तरुण गिर्यारोहकाचा मान मिळवणारी करवीरकन्या, गिर्यारोहक कस्तुरी दीपक सावेकर हिने आज जगातील सर्वांत उंच समजले जाणारे 8 हजार 848.86 मीटर उंचीचे माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. एव्हरेस्ट सर करणारी ती कोल्हापूरची पहिलीच गिर्यारोहक ठरली आहे.
वडिलांचा वाहन दुरुस्तीचा छोटा व्यवसाय, आई गृहिणी असलेल्या सामान्य कुटुंबातील कस्तुरी एकुलती एक कन्या. लहानपणापासूनच गडकोट किल्ले भ्रमंती करणाऱया आणि एनसीसीचे प्रशिक्षण घेतलेल्या कस्तुरीला आई-वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. यातूनच तिने थेट जगातील सर्वांत उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्याची धडपड सुरू केली. आर्थिक संकट असतानाही समाजातील काही दानशूरांच्या सहकार्याने तिने यासाठी तयारी केली. मात्र, कोरोनामुळे मोहीम थंडावली. गेल्या वर्षी मे महिन्यातच तिने माउंट एव्हरेस्टवर चढाई केली होती; परंतु अचानक आलेल्या वादळी वारे आणि खराब हवामानामुळे अखेरच्या टप्प्यावरून तिला माघारी फिरावे लागले होते. मात्र, निराश न होता नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावर ती पुन्हा 24 मार्च 2022 ला एव्हरेस्ट चढाईसाठी रवाना झाली.
तत्पूर्वी सरावादरम्यान 14 अष्टहजारीमधील दहावे ‘अन्नपूर्णा-1’ हे 26 हजार 545 फुटांवरील अत्यंत खडतर तसेच गिर्यारोहकांचा सर्वाधिक मृत्यूदर समजले जाणारे शिखर तिने 28 एप्रिल रोजी सर केले. कमी वयात हे शिखर सर करणारी जगातील ती सर्वांत तरुण गिर्यारोहक ठरली. यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या कस्तुरीने एव्हरेस्ट या आपल्या ध्येयाकडे कूच केले.
या मोहिमेसाठी नेपाळमधील ‘बीके एक्सपीडिशन’ या संस्थेचे तांत्रिक साहाय्य लाभले. या संस्थेचे सर्वेसर्वा लाखपा शेरपा व पेंबा शेरपा यांच्यासह उमेश झिरपे, फिटनेस कोच व एव्हरेस्टवीर जितेंद्र गव्हारे, जिम कोच विजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व अरविंद कुलकर्णी यांनी केल्याची माहिती दीपक सावेकर यांनी दिली.
अशी केली एव्हरेस्टवर चढाई
बुधवारी (दि. 4) ती एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचली. सर्व सज्जतेने सोमवारी (दि. 9) रात्री नऊ वाजता तिने चढाईला सुरुवात केली. मंगळवारी (दि. 10) दुपारी दोन वाजता कॅम्प दोनवर पोहोचली. हवामानाचा अंदाज घेत दोन दिवसांच्या तेथील मुक्कामानंतर गुरुवार (दि. 12) रोजी तिने कॅम्प-3 गाठले. शुक्रवारी (दि. 13) दुपारी कॅम्प-4 वर पोहोचली. थोडय़ा विश्रांतीनंतर रात्री सातच्या सुमारास तिने अंतिम समिटला सुरुवात केली. पूर्ण रात्र चालून तिने आज सकाळी 6 वाजता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर हिंदुस्थानचा तिरंगा व छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज फडकावला.
छत्रपती शाहू महाराजांना यश समर्पित
खडतर प्रवास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर ‘अन्नपूर्णा -1’ पाठोपाठ जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्ट ही दोन्ही स्वप्नवत ठरणारी शिखरे सर करणाऱया कस्तुरीने हे यश लोकराजा राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराजांना समर्पित केले. हिंदुस्थानचा तिरंगा तसेच छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज फडकावून तिने छत्रपती शाहू महाराजांनाही अभिवादन केल्याचे वडील दीपक सावेकर यांनी सांगितले. या यशात आई-वडिलांसह, मदत करणाऱया सर्वांचाच सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया एव्हरेस्टवीर कस्तुरीने वडील दीपक सावेकर यांच्याकडे व्यक्त केली.






























































