
व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी अपहरण करून डांबून ठेवून जमीन लिहून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावकार पती-पत्नीविरोधात अपहण, सावकारी, मारहाणीचा गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सुंदर काळे (रा. जामखेड) याच्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मोलमजुरी करून जीवन जगत आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांनी खासगी सावकार सुंदर काळे यांच्याकडून एक लाख 30 हजार रुपये 20 टक्के व्याजदराने घेतले होते. आजपर्यंत 60 हजार रुपये दिले आहेत. एक महिन्यापूर्वी सुंदर काळे व त्याच्या पत्नीने घरात घुसून रिक्षामध्ये घालून घेऊन गेले.
जामखेड शहरातील बीड रोड बैलबाजार येथील राहत्या घरामधील एका खोलीत डांबून ठेवले. दुसऱया दिवशी सकाळी 11 वाजता वकिलाकडून फिर्यादी पती-पत्नीकडून त्यांच्या जमिनीची बळजबरीने नोटरी करून घेतली. नंतर आठ दिवसांनी व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी सावकार पती-पत्नीने पुन्हा त्यांच्या घरात घुसून त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी अपहरणासह खासगी सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. आय. गाडे तपास करीत आहेत.




























































