
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
सांगलीतील स्टेशन चौकाचे ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक’ नामकरण व शिवसेनाप्रमुखांचे स्मृती शिल्प अनावरण आणि नवहिंद प्रतिष्ठानच्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मंत्री सामंत यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते, सांगली-सातारा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारा जनहिताचा कारभार राज्य सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार जास्तीत जास्त लोकहिताचे निर्णय घेत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पक्षविरहित नेतृत्व होते. यापुढे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण झटू, असे आवाहनही त्यांनी केले.
नवहिंद प्रतिष्ठानच्या वतीने शंभूराज काटकर यांनी स्वागत केले. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती शिल्पाबद्दल नगरसेविका स्वाती शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, रावसाहेब घेवारे, अनिल शेटे आणि जितेंद्र शहा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे, सुनीता मोरे, शहरप्रमुख महेंद्र चंडाळे, मयूर घोडके, हरिदास लेंगरे, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, तालुकाप्रमुख संजय काटे, विशाल राजपूत, पप्पू शिंदे, चंद्रकांत मैगुरे, महादेव मगदूम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





























































