ऍण्ड्रय़ू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ऍण्ड्रय़ू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघातात मृत्यू झाला. क्विन्सलॅण्डमधील ऍलिक रिव्हर ब्रिज येथील हार्वे रेंज रोडवर ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात 46 वर्षीय सायमंड्सला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांना त्याला वाचविण्यात अपयश आले. सायमंड्सच्या आकस्मित मृत्यूमुळे अवघ्या क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.

क्विन्सलॅण्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऍण्ड्रय़ू सायमंड्सचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटली. टाऊनस्विलीपासून 50 किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातामध्ये सायमंड्सचा मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा सायमंड्स हा गाडीमध्ये एकटा प्रवास करत होता. स्थानिक वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले, पण त्यांना सायमंड्सला वाचवण्यात यश आले नाही.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला वर्षातील तिसरा धक्का

ऍण्ड्रय़ू सायमंड्सचा मृत्यू हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांसाठी या वर्षातील तिसरा धक्का होय. यापूर्वी शेन वॉर्न आणि रॉडनी मार्श या दोघांचाही अशाच प्रकारे आकस्मिक मृत्यू झालाय. 4 मार्चला 74 वर्षीय रॉडनी मार्श यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच दिवशी 52 वर्षीय शेन वॉर्नचा थायलंडमधील फार्म हाऊसवर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या घटनेला दोन महिने होत नाही तोच आता ऍण्ड्रय़ू सायमंड्सवर काळाने घातला.