
‘दिल्लीतील बांधकामे योजनबद्ध पद्धतीने केली गेलेली नाहीत. 80 टक्क्यांवर बांधकामे ही बेकायदा आहेत असे म्हणता येईल. म्हणून काय तुम्ही 80 टक्के दिल्ली उद्ध्वस्त करणार का’, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला केला आहे. आम आदमी पार्टी बेकायदा बांधकामांच्या विरोधात आहे, पण दिल्लीतील 63 लाख घरे-दुकाने आम्ही तोडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दिल्लीमधील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याची मोहीम सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक आज बोलवली होती. त्या बैठकीत त्यांनी भाजपला लक्ष्य केले. दिल्लीतील 63 लाख लोकांची घरे आणि दुकानांवर बुलडोझर फिरवला गेला तर तो स्वतंत्र हिंदुस्थानातील सर्वात मोठा विनाश असेल, असे केजरीवाल या बैठकीत म्हणाले.
‘दिल्ली नगर निगमचे (एमसीडी) बुलडोझर वस्त्यांमध्ये घुसून कोणाचेही घर किंवा दुकान तोडून टाकतात. लोकांनी त्यांना कागदपत्रे दाखवली तरी त्याची खातरजमा ते करत नाहीत. तसे पाहिल्यास 50 टक्के लोक हे बेकायदा वस्त्यांमध्ये राहतात आणि 10 लाख लोक झोपडपट्टय़ांमध्ये राहतात. लाखो लोक असे आहेत ज्यांनी त्यांच्या घरांचा मूळ ढाचा बदलला आहे. ती सर्व घरे तोडून टाकणार का’, असे केजरीवाल म्हणाले. भाजपच्या या मोहिमेला विरोध करण्यासाठी प्रसंगी तुरुंगात जाण्यासही तयार राहा, असे आवाहन त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना केले.



























































