पश्चिम रेल्वेच्या लोकल फास्ट होणार, 30 ऐवजी 80 कि.मी.चा वेग पकडणे शक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेने वाणगाव येथे गेल्या रविवारी घेतलेल्या आठ तासांच्या मेगाब्लॉकने लोकलचा वेग वाढणार आहे. येथे अप आणि डाऊन ट्रेनसाठी स्वतंत्र पूल बांधण्यात आल्याने आता लोकल वेगाने चालविणे शक्य होणार आहे. यापूर्वी सुरक्षेच्या कारणांसाठी या सेक्शनमध्ये दर ताशी 30 कि.मी.च्या वेगाने लोकल धावायची. आता नव्या रचनेनंतर लोकल दर ताशी 80 कि.मी.च्या वेगाने चालविणे शक्य होणार आहे.

पश्चिम रेल्वेने गेल्या रविवारी मेगाब्लॉकमध्ये डहाणू क्षेत्रातील लोकलना अडथळा ठरणाऱया अप आणि डाऊन अशा दोन मार्गिकांसाठी स्वतंत्र पुलांची उभारणी करण्यात आली आहे. या वेब डिझाईनच्या पुलांमुळे पूर्वी दोन लोकल एकमेकांजवळून जात असल्याने काळजीपूर्वक चालविण्यात येत असायच्या. त्यामुळे डहाणू लोकलच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागायचे. आता अप आणि डाऊन दिशेसाठी वेगवेगळा पूल झाल्याने लोकल खेटून धावण्याची शक्यता शून्य झाली आहे.

लोकलचा आकार रुंद असल्याने अडचण

लोकलचा आकार नेहमीच्या डेमू किंवा मेमू अथवा मेल-एक्सप्रेसच्या आकारामानापेक्षा अधिक रुंद असल्याने येथे लोकल चालविताना काळजी घ्यावी लागत होती. आता अप आणि डाऊनसाठी स्वतंत्र मार्गिका झाल्याने लोकलच्या वेगावरील निर्बंध पूर्णपणे हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे डहाणू लोकल आता दर ताशी 80 कि.मी.च्या वेगाने धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.