
लहान मुले असल्याने उन्हात मोलमजुरीस जाण्यास नकार दिल्याने पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पती व दिराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली कुराडे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, सतीश सुभाष कुराडे व नाथा सुभाष कुराडे (सर्व रा. कुरणवाडी, ता. करमाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सतीश कुराडे याच्याबरोबर सोनालीचा विवाह झाला होता. ती मूकबधिर असून, तिला दीड वर्षाचा मुलगा आहे. गेल्या काही महिन्यांपासून पती सतीश व पत्नी सोनाली यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. सोनालीला बोलता येत नसल्याने माहेरी गेल्यानंतर तिने हातवारे करून भाऊ अशोक शोभाचंद्र लवटे याला मारहाण होत असल्याचे सांगितले. त्यानंतर ती परत सासरी आल्यानंतर पती सतीश कुराडे हा तिला मोलमजुरीला जाण्यासाठी तगादा लावत त्रास देऊ लागला होता.
मुलगा लहान असल्याने ती उन्हात मोलमजुरीस जाण्यास नकार देऊ लागल्याने जबर मारहाण केली. यात तिला मुका मार लागल्याने भाऊ अशोक हा तिला घेऊन गेला. तिच्यावर श्रीगोंदा येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अशोक लवटे याने पोलिसांत फिर्याद दिली असून, पती सतीश सुभाष कुराडे व दीर नाथा सुभाष कुराडे यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे तपास करीत आहेत.



























































