सातशे वर्षे पुरातन बारवेची श्रमदानातून स्वच्छता, कासवाची जोडी सापडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानवत शहरातील सातशे वर्षे जुन्या पुरातन बारवेला स्वच्छ करण्याचा स्वयंस्फूर्त युवकांनी विडा उचलला आणि पाहता पाहता अनेकांनी या श्रमदानात आपले योगदान दिले. बारवेत मोठ्या प्रमाणात घाण, गाळ, चिखल, कचरा झाला होता. युवकांनी आणि समाजातील दानशुर धुरिणांनी अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर या बारव स्वच्छतेसाठी श्रमदान केले. यामुळे अत्यंत सुंदर कलाकुसरींनी बांधलेल्या या बारवेने आता मोकळा श्वास घेतला आहे. विशेष म्हणजे यात सुंदर कासवाची जोडी सापडली असून पुन्हा बारवेत सोडण्यासाठी कार्यकत्र्यांनी मंदिरातील पाण्याच्या हौदात ती सुरक्षित ठेवली आहे.

प्राचीन काळी शहर व ग्रामीण भागामध्ये बारवांकडे पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून बारवांकडे पाहिले जायचे. परंतु, यांची देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे हे जलस्रोत कायमचेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी मानवत येथील युवकांनी एकत्र येत या चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. श्रमदानातून युवकांनी पुढाकार घेत ते बारवस्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे या बारवांचे संवर्धन होऊन पुन्हा एकदा आटलेले जलस्रोत प्रवाहित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज या बारवेच्या स्वच्छतेचा पंधरावा दिवस असून, आणखी एक आठवडा हे काम चालणार आहे. दररोज अत्यंत उत्स्पूâर्तपणे हे श्रमदानाने बारव स्वच्छतेचे काम चालू आहे. काटेरी झाडांनी वेढलेल्या बारवेलगतच्या साफसफाईसाठी युवकांनी स्वत:च्या खिशातून रक्कम टाकून जेसीबी आणली हे विशेष. अभिजित करपे, रवी वाघमारे, सर्पमित्र गोपाळ गिरी, बालाजी सोनवणे, तुळशीराम सोळूके, सुनील फटाळ, सुरेश गोलाईत, योगेश्वर आम्ले, यशोदीप जडे, उमेश काळे, संतोष मसूरे, प्रणव बोरकर, प्रवीण ब्रह्मपूरकर, श्याम कदम, नितीन झगडे, वैभव बर्डे, गणेश भरड आदी युवक या कामी योगदान देत आहेत.

घरी हाताने तांब्याभर पाणी न घेणारे हे तरुण एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन कुठल्या जमान्यातली ही घाण स्वहस्ते साफ करीत आहेत. या जागेची स्वच्छता सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर साप निघत आहेत. भारलेल्या पायऱ्यावर दिसणाऱ्या धामिनी व सापांच्या बंदोबस्तासाठी आलेला गोपाल गिरी हा सर्पमित्र आता या टीमचा सदस्य बनला असून, तोदेखील आघाडीवर आहे. जो आला तो रमला! अशीच काहीशी अवस्था या ठिकाणी पहायला मिळत आहे. बारवेतील साचलेले घाण हिरवटपाणी कसे बाहेर काढावे? म्हणून ‘मडपंप’ साठी मुलांची शोधाशोध सुरू होती. आज शेवटी मानवतचे नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड व पंकज आंबेगावकर यांनी हा प्रश्न मार्गी लावला. प्राचीन वारसा संवर्धनाचे कार्य हाती घेतलेल्या मानवत येथील युवकांच्या दिशादर्शक समाजकार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. या कार्याला मिळत असलेला जनाधार पाहता तरुणाईचा उत्साह शतगुणित झाला आहे.

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

पूर्वीच्या काळी दगडी बारव बांधून त्यात पाण्याची साठवणूक होत असे, आजही या बारवांच्या बांधकामांकडे आकर्षक, उत्कृष्ट प्राचीन कलेचा नमुना म्हणून पाहिले जाते. काळाच्या ओघात बारव नामशेष होत चालली आहेत. पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने शहरातील जुन्या, प्राचीन काळातील चार बारव नामशेष होऊ लागल्या आहेत. प्राचीन काळातील या वास्तुंचे संवर्धन व जोपासना करावी, अशी मागणी बारव संवर्धन समितीने केली आहे.