
लग्नाच्या हॉलमधील वधूच्या खोलीतून मोबाईल व लेडिज पर्स चोरून एक चोरटा शिताफीने हाँलबाहेर सटकला, पण ही चोरी वेळीच लक्षात येताच पाहुण्या मंडळींनी आरडाओरड सुरू केली. चोर पकडा असा आवाज ऐकून त्याच परिसरातून जाणाऱया दुचाकीस्वाराने मोठय़ा हिमतीने त्या चोराला पकडले. यावेळी चोराने केलेल्या चाकू हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाला. दर्शन जनगरी असे त्या दुचाकीस्वार विद्यार्थ्याचे नाव आहे.
बुधवारी दुपारी मांटुग्याच्या पालपकोट हॉलमध्ये लग्न सोहळा सुरू असताना एक चोरटा आत घुसला. तो वऱ्हाडी मंडळीतून वाट काढत वधूच्या खोलीत कोण नसल्याचे बघून आत घुसला. खोलीत असलेला मोबाईल व लेडिज पर्स चोरून खोलीबाहेर आला. तेवढय़ात उपस्थितांपैकी काहींच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी चोर चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली. तसा तो धक्का देत हॉलबाहेर पडला आणि पळू लागला. नातेवाईकांनी पाठलाग करत चोर पकडा असा आवाज देऊ लागले. चोरटा हॉलपासून 200 फुटांपर्यंत गेला असेल तेवढय़ात तिकडून जाणाऱया दुचाकीस्वाराने त्याला पाहिले आणि आपली गाडी त्याच्या आडवी लावली. चोरटा थांबताच दुचाकीस्वार दर्शन जुनगरी (21) याने त्याला पडडले, पण त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी चोराने दर्शनवर वार केले. परंतु तरीही न डगमगता दर्शनने त्याला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे नातेवाईकांनी धावत येऊन सुरेंद्र जाधव (41) या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दर्शनच्या जिगरबाज कामगिरीमुळे एक चोरटा पकडला गेला. याची दखल घेत माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सहकाऱयांसह वडाळा बस डेपो वसाहतीत राहणाऱया दर्शनच्या घरी जाऊन त्याने केलेल्या धाडसी कामाचे कौतुक केले. दर्शन हा विद्यार्थी असून आयआयटीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.



























































