
पुणे शहरातील उंड्री परिसरात चोरट्यांनी फ्लॅटसह किराणा मालाच्या दुकानात चोरी करून साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी साईनिवास सोसायटी आणि मंगळवारी वडाचीवाडी परिसरातील किराणा दुकानात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उंड्रीतील साई निवास सोसायटीत चोरट्यांनी शुक्रवारी रात्री साडेनऊ ते पावणेबाराच्या सुमारास खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू असा 2 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सुमित गावंडे यांनी तक्रार दिली आहे.
दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी वडाचीवाडी रस्त्यावरील किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून किराणा साहित्य, एक तोळ्याचे दागिने, रोकड असा मिळून 1 लाख 5 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 9 ते 10 मे रोजी घडली. याप्रकरणी दीनेशकुमार पटेल (वय 34) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.





























































