
रेल्वेच्या फलाटांवर आरओचे शुद्ध पाणी नाममात्र दरात देण्याची आयआरसीटीसीची योजना फेल गेल्यानंतर आता मध्य रेल्वे विविध स्थानकांवर पाणी विकणार आहे. हे पाणी विकण्यासाठी आता दुसऱयांदा टेंडर काढण्यात आले आहे. मध्य रेल्वेने आपल्या विविध कॅटगरीच्या स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यासाठी प्रथमच क्लस्टर टेंडर काढले आहे.
रेल्वेचे तिकीट व खानपान व्यवस्था सांभाळणाऱया ‘आयआरसीटीसी’ने काही वर्षांपूर्वी मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन बसविल्या होत्या. या मशीन चालविण्यासाठी नेमलेले कंत्राटदार फायद्याचे गणित फिस्कटल्याने या योजनेतून बाहेर पडल्याने रेल्वे स्थानकातील प्रवाशांचे वांदे झाले आहेत. उन्हाळय़ात फलाटाच्या कॅण्टिनमध्ये मिळणारे ‘रेल नीर’चे पाणी प्रवाशांना प्यावे लागत आहे, परंतु सर्वसामान्य जनतेला रेल्वेच्या पाणपोईंचा आसरा उरला आहे. परंतु यातील छोटय़ा स्थानकातील पाणपोई गैरसोयीच्या आणि अस्वच्छ बनल्या आहेत.
इन्स्टॉलेशन व ऑपरेशनची अट
मध्य रेल्वेने आधी 36 स्थानकांवर वॉटर कूलर मशीन बसविण्यासाठी याआधी टेंडर काढले होते. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने आता मध्य रेल्वेने विविध वर्गवारीच्या 28 रेल्वे स्थानकांत एकूण 41 वॉटर वेंडिंग मशीन लागणार आहेत. टेंडरमध्ये मशीनची ‘उभारणी करणे आणि त्याचे संचलन’ करण्याच्या अटीवर 15 मे रोजी नवे टेंडर काढले आहे. 28 स्थानकांचे ए, बी, सी, डी, ई आणि एफ असे विविध सहा क्लस्टर करण्यात आले आहेत.
येथे वॉटर वेंडिंग मशीन लागणार
उपनगरीय सेक्शनमध्ये चेंबूर, मानखुर्द, मस्जिद बंदर, वडाळा रोड, किंग्ज सर्कल, रे रोड, जीटीबी, डॉकयार्ड रोड तसेच शहाड, आंबिवली, आसनगाव, कसारा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, नेरळ, कर्जत, खोपोली, लोणावळा आणि रोहा अशा स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन बसविण्याचे टेंडर निघाले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पाच मशीन लागणार असून सध्याच्या फलाट क्र. 1 वर दोन मशीन, फलाट क्र. 2/3 वर दोन आणि फलाट क्र. 4 /5 वर एक अशा पाच मशीन लागणार आहेत.
कल्याण जंक्शनमध्ये फलाट क्र. 1 वर दोन मशीन, फलाट क्र. 4/5, फलाट क्र. 6/7 वर प्रत्येकी एक अशा चार मशीन लागतील. इगतपुरी येथे फलाट क्र. 1 वर एक, 2/3 वर दोन आणि फलाट क्र. 4 वर एक अशा चार मशीन लागतील.
पनवेल येथे फलाट क्र. 1/2 (उपनगरीय कॉनकोर्सजवळ) एक, फलाट क्र. 5 वर एक, फलाट क्र. 5/6 वर दोन अशा चार मशीन तर रोहा येथे एक वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहेत.

























































