
मुळा धरणाच्या परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या आठ गावरान गायी व कालवडी चोरी गेल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळा धरणाच्या परिसरात काही आदिवासी समाजाचे वास्तव आहे. मच्छीमारीचा व्यवसाय असलेल्या आदिवासी कुटुंबाकडून जनावरांना चारा- पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने गायी व कालवडींना धरणाजवळील क्रीडा भवनाजवळ चरण्यासाठी सोडले जात आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे 8 गायी व कालवडीचा कळप चरण्यासाठी सोडण्यात आला होता. मात्र, रविवारी सकाळी संपूर्ण कळप गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित मालकांनी रविवारी सकाळी राहुरी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































