
ज्ञानवापी मशीद-शृंगारगौरी मंदिरप्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयात आज हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांकडून 45 मिनिटे युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने कोर्ट कमिशनने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालाविरोधात हरकत मागवण्याच्या याचिकेवर आधी सुनावणी घ्यावी की मशीद समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यावी, याबाबतचा निर्णय उद्या, 24 मेपर्यंत राखून ठेवला आहे.दरम्यान, वाराणसी जिल्हा न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे.
ज्ञानवापी मशीद परिसरात केलेल्या फोटो, व्हिडीओग्राफी सर्वेक्षणाचा अहवाल शनिवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात कोर्ट कमिशनने सादर केला. याचा आधार घेत मशीद परिसरात शृंगारगौरी आणि शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाला त्यावर तत्काळ निकाल देण्याला स्थगिती दिली. दरम्यान, सर्वेक्षणाला बंदी घालावी आणि मशिदीत हिंदूंची प्रतीके असल्याचा दावा करणारी याचिका रद्द करावी, अशी मागणी मुस्लिमांच्या अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात केली. मात्र सर्वेक्षणाला बंदी न करता या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात केली जावी. याचिकेचे गांभीर्य लक्षात घेता अनुभवी जिल्हा न्यायाधीश हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळू शकतात, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे सोपवले आहे. दरम्यान, कोर्ट कमिशनने त्यांचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांच्या हरकती नोंदवाव्यात तसेच कमिशनचा अहवाल आणि व्हिडीओग्राफी हिंदू पक्षकारांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी हिंदू पक्षकारांचे वकील मोहन यादव यांनी केली तर हिंदू पक्षकारांनी दाखल केलेली याचिकेला कोणताही आधार नाही. त्यामुळे ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने केली.
शिवलिंगाची पूजा करण्यास परवानगी द्या
श्रीकाशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी यांनी ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाची रोज पूजा करण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी, अशी याचिका आज दाखल केली. ते म्हणाले, ‘ज्ञानवापी ही मशीद कधीच नव्हती, ती प्राचीन काळापासूनचे मंदिर आहे. आता आमचे आराध्यदैवत सापडले आहे, आम्हाला त्याची दररोज पूजा करायची आहे. किती क्लेशदायक आहे की, परमेश्वर दररोज स्नान, श्रृंगार आणि भोगाशिवाय जगतो. त्यामुळे आमच्या भोलेनाथाच्या पूजेला परवानगी मिळावी, असे तिवारी यांनी सांगितले.
























































