
आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटाबाबत देशभरातील राज्यांमध्ये धावपळ सुरू झाली असतानाच बिहारने मात्र याचसंदर्भात एक धाडसी निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. त्यासाठी तिथे येत्या 1 जून रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होईल आणि त्यानंतर जनगणनेचा निश्चित कार्यक्रम बनवला जाईल.
जातीनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवली जाईल,’ असे जनता दल (युनायटेड) चे अध्यक्ष व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार सर्वपक्षीय बैठक येत्या 1 जून रोजी होणार असल्याचे बिहारचे संसदीय कार्यमंत्री विजय चौधरी यांनी सांगितले. या सर्वपक्षीय बैठकीत बिहार भाजपही सहभागी होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. यापूर्वी 27 मे रोजी बैठक बोलवण्याबाबत राजकीय पक्षांचे मत जाणून घेण्यात आले होते. त्यावर एकमत होऊ शकले नव्हते. आज सर्वच पक्षांनी 1 जून या तारखेवर शिक्कामोर्तब केले, असे चौधरी यांनी सांगितले.


























































