
यंदाच्या 15 व्या टाटा आयपीएलची अंतिम लढत गुजरातच्या अहमदाबादमधील भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मेगाफायनल लढतीची ऑनलाइन तिकिटे काही तासांतच विकली गेली आहेत. ज्यांना तिकिटे मिळाली नाहीत ते क्रिकेटशौकीन नऊ पट अधिक दराने पंधराव्या आयपीएल फायनलचे तिकीट विकत घ्यायला तयार आहेत. 800 रुपयांच्या तिकिटासाठी आठ हजार रुपये तर 1500 रुपयांच्या तिकिटासाठी 15 हजार रुपये मोजण्याचीही तयारी काही क्रिकेटप्रेमींनी दर्शवली आहे. विशेष म्हणजे सर्व आलिशान सोयी आणि अंतिम लढतीसह एलिमिनेटर-2 लढत पाहण्याची संधी सर्वात महागडय़ा 65 हजार रुपये किमतीच्या तिकिटावर मिळणार आहे. ही सर्वात महागडी तिकिटेही काही तासांतच विकली गेली आहेत.
यंदाच्या 15 व्या टाटा आयपीएलची अंतिम लढत प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन पाहण्याला क्रिकेटशौकीन अग्रपसंती देत आहेत. आयपीएल अंतिम लढतीचे सर्वात स्वस्त तिकीट 800 रुपये तर सर्वात महागडे तिकीट 65 हजार रुपये किमतीचे आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 32 हजार इतकी प्रचंड आहे. यंदाची आयपीएलची लढत रविवारी असल्याने हे स्टेडियम खचाखच भरण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलवेडय़ा चाहत्यांनी तिकिटावर उडय़ा घेत आधीच सर्व तिकिटे विकत घेतली आहेत. त्यामुळे यंदा अहमदाबादमध्ये रविवारी आयपीएल फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार मोठय़ा प्रमाणात होणार हे मात्र निश्चित.
काय आहेत 65 हजारांच्या तिकिटावर रॉयल सुविधा
नरेंद्र मोदी स्टेडियमचे सर्वात महागडे तिकीट 65 हजार रुपयांचे आहे. हे महागडे तिकीट खरेदी करणाऱयाला क्वालिफायर-2 आणि आयपीएल अंतिम लढत पाहायला मिळणार आहे. तिकीटधारकांसाठी वेगळी केबिन, अमर्यादित भोजन, टीव्ही सेट आणि आरामदायक सोफा पुरवला जाणार आहे. विशेष म्हणजे ही महागडी तिकिटे क्रिकेटशौकिनांनी काही तासांतच विकत घेतली आहेत.
अहमदाबादच्या हॉटेलांचे बुकिंग हाऊसफुल्ल
टाटा आयपीएल फायनल रविवार, 29 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे अहमदाबाद शहरातील सर्व लहान मोठय़ा निवासी हॉटेलांचे बुकिंग आताच हाऊसफुल्ल झाले आहे. आयपीएल फायनल बघायला येणाऱया प्रेक्षकांच्या मोठय़ा संख्येमुळे देशातील अन्य महानगरांतून विमानाने येणाऱया प्रवाशांसाठीची तिकिटेही प्रचंड महागली आहेत. याशिवाय हॉटेलच्या रूमचे भाडेही कडाडले आहे. सात हजार रुपये दैनिक भाडय़ाच्या डिलक्स रूमचे बुकिंग चक्क 15 हजार रुपये मोजून केले जात आहे. या रूम्सना मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगळुरूच्या प्रेक्षकांकडून मोठी मागणी आहे.




























































