
भीमाशंकरला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागल्याची घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात शनिवारी सकाळी घडली आहे. दरम्यान, वाहनाला आग लागल्याची चंदनापुरी घाटातील ही तिसरी घटना आहे.
टेम्पो ट्रॅव्हलर चालक विजय कोंडीबा काकडे (रा. शिर्डी) हे शिर्डी येथून दहाजणांना देवदर्शनासाठी भीमाशंकरला घेऊन जात होते. शनिवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात आले असता, टेम्पो ट्रॅव्हलरने पेट घेतला. त्यामुळे सर्व प्रवासी घाबरून खाली उतरले. टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याची माहिती समजताच, डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, नारायण ढोकरे, पंढरीनाथ पुजारी, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्रावतार धारण केला होता. त्यानंतर ही आग विझवण्यात आली. तोपर्यंत टेम्पो ट्रव्हलर मोठय़ा प्रमाणात जळून खाक झाली होती. या आगीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगीचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना आग लागण्याची ही तिसरी घटना असून, यापूर्वी दहावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन निघालेला टेम्पो आणि एका ट्रकला आग लागल्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या.




























































