
मुंबईत कोरोना पुन्हा वाढू लागल्याने एकाच महिन्यात सक्रिय रुग्णांमध्ये तब्बल चार पटींनी वाढ झाली आहे. 1 मे रोजी मुंबईत केवळ 628 सक्रिय रुग्ण होते. 31 मे रोजी ही संख्या 2526 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देताना आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय 141 खासगी रुग्णालयांनाही त्यांच्याकडील बेड कोरोना रुग्णांसाठी तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केला. यानंतर कोरोनाच्या तीन लाटा आल्या. पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या तीनही लाटा यशस्वीपणे परतवून लावण्यात यश आले. मात्र मार्चच्या सुरुवातीलाच कानपूर ‘आयआयटी’ने चौथी लाट येण्याचा इशारा दिला होता. या इशाऱयानुसार मुंबईत रुग्णवाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एप्रिलनंतर कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या 34 पर्यंत खाली आली होती. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्या वाढू लागली असून दैनंदिन रुग्णसंख्या 500 च्या वर गेली आहे.
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये रुग्णालयांत दाखल होणाऱया रुग्णांची संख्या मोठी असल्याने दहा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आली. तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर दहिसर, नेस्को गोरेगाव फेज 1 व 2 आणि कांजुरमार्ग जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत.
तर बीकेसी, शीव, रिचर्डसन आणि क्रुडास-भायखळा, रिचर्डसन आणि क्रुडास-मुलुंड आणि वरळी सेंटर सद्यस्थितीत कोणत्याही वेळेत सुरू करता येतील या स्थितीत ठेवण्यात आली आहेत. या दहा जम्बो कोविड सेंटरमध्ये एकूण 15 हजार बेड आहेत. सुरू असलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील बेड केव्हाही सुरू करता येतील अशा स्थितीत सज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
खासगी रुग्णालयांत 16 हजार बेड
रुग्णसंख्या वाढतच राहिली तर रुग्णांना दाखल करण्यासाठी 141 खासगी रुग्णालयांना बेड सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत खासगी रुग्णालयांत अडीच हजार बेड ऑक्टिव्ह असून केवळ 100 रुग्ण दाखल असल्याची माहिती खासगी रुग्णालय समन्वयक गौतम भन्साली यांनी दिली. आवश्यकतेनुसार बेडची संख्या 16 हजारांपर्यंत वाढवता येईल, असेही ते म्हणाले.
सक्रिय रुग्ण
- 1 मे 628
- 11 मे 851
- 21 मे 1212
- 31 मे 2526
आठवडाभराची रुग्णवाढ
- 25 मे 218
- 26 मे 350
- 27 मे 352
- 28 मे 330
- 29 मे 375
- 30 मे 318
- 31 मे 506
कोरोना टेस्ट वाढवा
मुंबईत वाढणाऱया रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चाचण्या वाढवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. शिवाय कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळ, औषधे, यांत्रिकी सामग्री तैनात ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.
सध्या 7 ते 10 हजार चाचण्या होत असताना 5 ते 10 टक्क्यांपर्यंत बाधित आढळत आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात 5 टक्क्यांपेक्षा जास्त बाधित आढळल्यास उपाययोजना कराव्या लागतात.
आयुक्तांच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात येत असून 20 हजार बेड तैनात असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
घाबरू नका, मंकी पॉक्सचा एकही रुग्ण नाही
घाबरू नका, महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही.खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळांवर बाहेरून येणाऱया प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग होत आहे. राज्यामधील 36 जिह्यांपैकी मुंबई आणि पुणे येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
जम्बो कोविड सेंटरची गरज नाही
साडेतीन हजार सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. त्यातील अडीच हजार
रुग्ण एकटय़ा मुंबईत आहेत. रुग्णालयांमध्ये रुग्णांची भरती मोठय़ा प्रमाणात होत नसल्याने सध्या तरी जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नसल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
पावसाळी आजारांची काळजी
पावसाळय़ात साथीचे रोग वाढतात. कारण पावसाळय़ामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी पाणी साचलेले दिसते. त्या साचलेल्या पाण्यात मच्छरांची पैदास होते. ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे तेथील नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, अशा सूचना आरोग्य विभागातून नेहमीच दिल्या जातात, असेही राजेश टोपे म्हणाले.




























































