
>>डॉ. मंजिरी भालेराव
प्राचीन जावा ‘यवद्वीप’ या नावाने प्रसिद्ध होते. तेथे काळाच्या ओघात हिंदुस्थानी संस्कृतीचा प्रसार अतिशय मोठय़ा प्रमाणात झाला. तिथली परंपरा असे सांगते की, इसवी सनाच्या पहिल्या शतकात ‘अजिसक’ याने आपले राज्य जावामध्ये स्थापन केले. पुढे पंधराव्या शतकापर्यंत तेथे हिंदुस्थानी संस्कृतीची भरभराट होत गेली. फा-हियान हा चिनी प्रवासी इ. स. 418 च्या सुमारास जावात गेला तेव्हा तेथे त्याला हिंदू धर्माचे प्राबल्य असल्याचे दिसले. त्याच्या नोंदीनुसार त्या वेळी बौद्ध धर्माचा फारसा प्रसार तेथे झाला नव्हता.
हिंदुस्थानातील व्यापारी, प्रवासी प्राचीन काळापासून जगाच्या विविध भागांत जात होते. त्यापैकी काही त्या ठिकाणीच राहत, तर काही परत हिंदुस्थानात येत. ते जिथे गेले तिथे त्यांनी आपल्या संस्कृतीचा प्रसार केला, किंबहुना त्या त्या स्थानिक लोकांनी हिंदुस्थानी संस्कृती सहज आत्मसात केली. हिंदुस्थानी लोकांच्या या प्रवासाच्या आणि परदेशातील वास्तव्याच्या खुणा आशियातील अनेक देशांमध्ये स्पष्ट दिसतात. ते तिथे जाऊन केवळ राहिलेच नाहीत, तर त्यांनी तिथे राज्य स्थापन केले. आपल्या राज्यात हिंदू, बौद्ध धर्मांचा प्रसार होईल असे पाहिले. त्या धर्मांसाठी कला आणि स्थापत्य निर्माण केले.
यापैकीच एक देश म्हणजे आजचा इंडोनेशिया. 17,504 बेटांचा समूह असलेल्या देशातील फक्त 6 हजार बेटांवर मानवाची वस्ती आहे. जगातला सर्वात जास्त भूपंपप्रवण प्रदेश अशीही याची ओळख आहे. तसेच आज हा जगातला सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे, पण याच देशातील विविध बेटांवर प्राचीन काळात झालेल्या वस्तीच्या खुणा, कला-स्थापत्याचे अवशेष ठायी ठायी विखुरले आहेत. या बेटांमध्ये जावा हे एक अतिशय महत्त्वाचे बेट होते हे आजही लक्षात येते.
प्राचीन जावा ‘यवद्वीप’ या नावाने प्रसिद्ध होते. तेथे काळाच्या ओघात हिंदुस्थानी संस्कृतीचा प्रसार अतिशय मोठय़ा प्रमाणात झाला. तिथली परंपरा असे सांगते की, इसवी सनाच्या पहिल्या शतकात ‘अजिसक’ याने आपले राज्य जावामध्ये स्थापन केले. पुढे पंधराव्या शतकापर्यंत तेथे हिंदुस्थानी संस्कृतीची भरभराट होत गेली. फा-हियान हा चिनी प्रवासी इ. स. 418 च्या सुमारास जावात गेला तेव्हा तेथे त्याला हिंदू धर्माचे प्राबल्य असल्याचे दिसले. त्याच्या नोंदीनुसार त्या वेळी बौद्ध धर्माचा फारसा प्रसार तेथे झाला नव्हता. जावा या बेटाचा उल्लेख आपणास रामायणात आढळतो. जावा हे नाव संस्कृतमधील ‘यव’ या शब्दापासून तयार झाले असावे. यव किंवा जव याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणारा प्रांत म्हणून याचे नाव यवद्वीप पडले असावे असे वाटते. जावामध्ये अनेक लहान लहान हिंदू राज्ये होती. जावामध्ये मिळालेल्या चार संस्कृत शिलालेखांवरून पाचव्या शतकात पूर्णवर्मा नावाचा राजा पश्चिम जावावर राज्य करीत असल्याची माहिती मिळते. यानंतर काळाच्या ओघात राजा संजय, शैलेंद्र घराणे, धर्मोदय महाशंभू, राजा विजय, राजा राजसनगर राजा असे राज्यकर्ते इथे होऊन गेले. शेवटी इसवी सनाच्या 16व्या शतकात इथे इस्लामी राजवट आली असे दिसते.
हिंदू धर्माची अनेक मंदिरे जावामध्ये आढळतात. प्रामुख्याने शिव, विष्णू व ब्रह्मा यांची मंदिरे बांधली गेली. शिव, विष्णू व दुर्गा यांच्या मूर्तीही इथे सापडल्या आहेत. बुद्धाच्या मूर्ती व तसेच स्तूपही जावामध्ये आढळतात. हिंदू धर्म व बौद्ध धर्म हे एकमेकांना पूरक अशा पद्धतीनेच या ठिकाणी पसरले होते. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांनी तर जावामध्ये लोकप्रियतेचे शिखरच गाठले होते.
जावामध्ये अनेक ठिकाणची मंदिरे आणि मंदिर समूह विविध काळात निर्माण झाले. त्यापैकी काहींचा इतिहास तर काहींच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. यामध्ये मध्य जावामधील योग्यकर्ता शहराच्या जवळ इसवी सनाच्या 8व्या – 9व्या शतकात बांधलेला प्रम्बनन येथील मंदिरसमूह उल्लेखनीय आहे. इंडोनेशियामध्ये मंदिरांना ‘चंडी’ असे म्हणतात, म्हणून याला ‘चंडी प्रम्बनन’ असे म्हटले जाते. इथे एकूण 508 मंदिरे किंवा त्यांचे अवशेष नोंदले गेले आहेत. जावामधील लोक त्यांच्या भाषेत याला ‘लारा (किंवा लोरो किंवा रारा) जोन्ग्रांग’ या नावाने ओळखतात. इथे असलेली मंदिरे शिव, विष्णू, ब्रह्मा इ. हिंदू देवतांची तर आहेतच, पण ‘चंडी सेवू’ ही बौद्ध मंदिरेही आहेत. प्रम्बनन मंदिर समूहाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
‘लारा जोन्ग्रांग’ या नावाचा स्थानिक भाषेत अर्थ आहे ‘सडपातळ तरुणी/ कुमारी’! हे नाव रूढ होण्यामागे एक लोककथा आहे. तिच्यानुसार, ‘‘खूप वर्षांपूर्वी इथे रातू बोको नावाच्या नरभक्षक राक्षस राजा आणि त्याच्या शेजारच्या राज्यातील पेंगिंग राज्याचा राजकुमार बांडुंग बांदवासा यांचे युद्ध झाले. त्यात रातू बोको हरला, पण बांडुंग पराभूत राजाच्या अत्यंत सुंदर मानवी रूपातील मुलीच्या म्हणजे लारा जोन्ग्रांग हिच्या प्रेमात पडला आणि तिला विवाहाची मागणी घातली. तिने सुरुवातीला स्पष्ट नकार दिला, पण जेव्हा तो ऐकेना तेव्हा तिने त्याला तिची अट पूर्ण केली तर लग्न करेन, असे सांगितले. ती अट म्हणजे एका रात्रीत खूप खोल विहीर खणणे आणि त्या परिसरात हजार मंदिरे बांधणे. राजकुमार बांडुंग याने ती मान्य केली. आधी युद्धात त्याने जिंकण्यासाठी काही जादुई शक्तींची (जीन किंवा यक्षांसारखे लोक) मदत घेतली होती. त्यांच्या मदतीनेच त्याने या अटी पूर्ण करायला सुरुवात केली. विहीर खणून झाली. तेव्हा लारा त्याला म्हणाली की, खाली उतरून ती किती खोल आहे ते पहा. जेव्हा तो विहिरीत उतरला तेव्हा तिने वरून दगड, माती टाकून त्याला आतच पुरायचे ठरवले, पण तरीही तो जादुई शक्तीच्या मदतीने बाहेर आला. तिच्यावरील निस्सीम प्रेमामुळे त्याने तिला न रागावता 1000 मंदिरे बांधायला सुरुवात केली. 999 मंदिरे बांधून झाली असता राजकुमारीला भीती वाटली की, आता तिला याच्याशी लग्न करावे लागेल. तेव्हा तिने तिच्या सख्यांच्या मदतीने जणू काही रात्र संपली, सूर्योदय झाला आहे असे भासवले. तेव्हा राजकुमाराला मदत करणारे जादुई शक्ती असणारे घाबरून पळून गेले आणि एकच मंदिर अर्धवट राहिले, तो राजकुमारीची अट पूर्ण करू शकला नाही. तिने असे फसवल्याने तो संतप्त झाला, तिला शाप दिला आणि त्यामुळे तिचे रूपांतर एका दगडी मूर्तीत झाले.’’ त्या मंदिरांमध्ये एक सुंदर दुर्गादेवीची मूर्ती आहे. तीच शापित सुंदर सडपातळ तरुणी राजकुमारी ‘लारा जोन्ग्रांग’!
लारा जोन्ग्रांगचा मंदिर समूह संपूर्णतः हिंदू आहे. यामध्ये शिव, ब्रह्मा, विष्णू यांची देखणी मंदिरे तर आहेतच, पण त्यांच्या वाहनांचीही मंदिरे आहेत. शिवाला खूप महत्त्व असल्यामुळे त्याचे मंदिर सर्वात मधोमध आणि सर्वात उंच आहे. ते 47 मीटर उंच आणि 34 मीटर रुंद आहे. या मंदिरातच दुर्गेची एक खूप देखणी मूर्ती आहे. तिलाच लोक लारा जोन्ग्रांग समजतात. या मंदिराच्या चारही बाजूने जे कठडे आहेत ते रामायणातील कथांनी सजवले आहेत. शिवाच्या मंदिराच्या दोन्ही बाजूला मंदिरे आहेत, त्यात एक ब्रह्मा आणि दुसरे विष्णूचे आहे. त्याही मंदिरांवर शिल्पांनी सजावट केली आहे. हा मंदिर समूह इंडोनेशियातील सर्वात मोठा मंदिर समूह आहे. जरी नाव एका राजकुमारीचे मिळाले असले तरी इथे सर्वच देवांना प्रतिनिधित्व मिळालेले आहे.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,
पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत) [email protected]





























































