अपंगत्व आल्यासही नोकरी कायम राहील! एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य परिवहन सेवेत असताना अपघातामुळे अपंगत्व आल्यास अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त न करता महामंडळ त्यांचा आयुष्यभर सांभाळ करणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना करण्यायोग्य नोकरी नसेल तर महामंडळ त्यांना अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घेणार आहे.

ज्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आलेले आहे, अशा कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी व अपंगत्वाचा दाखला आदींची पूर्तता चार आठवडयांच्या मुदतीत करून घेण्यात येणार असून अपंग कर्मचाऱ्यांनी दाखला सादर केल्यापासून दोन आठवड्यात त्यांना पर्यायी नोकरी देण्यात येणार आहेत.

अपंगत्व आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा करुन, सत्यतेची पडताळणी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून दोन आठवडयांच्या मुदतीत करण्यात यावी असे आदेशच महामंडळाने सर्व विभागांसाठी काढले आहेत. अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा केल्यानंतर हा दाखला योग्य असल्याचे आढळून आल्यास. परिवहन महामंडळ त्यांना पर्यायी नोकरी देणार आहे.

अधिसंख्य पदावर नियुक्ती होणार

जे कर्मचारी वैद्यकीयदृष्टया कोणतेही काम करण्यास अपात्र असतील किंवा समकक्ष पद उपलब्ध नसल्यास, त्यांची नियुक्ती ‘अधिसंख्य’ पदावर होणार आहे. या पदांमुळे त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्त वेतन व पीएफ आदी फायदे जरी मिळणार नसले तरी त्यांचे वेतन अखेरपर्यंत मिळत राहील अशी तजवीज करण्यात आली आहे. विकास केंग व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व रा.प. महामंडळ या रिट याचिका क्र. 9762/2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सुधारीत हे आदेश महामंडळाने काढले आहेत.