बैठका पुरे झाल्या; कारवाईची धमक दाखवा! केजरीवालांचे केंद्राला आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मिरी पंडितांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी भाजप आणि मोदी सरकारकर जोरदार हल्ला चढवला. कश्मिरी पंडितांवर जेव्हा जेव्हा हल्ले होतात, तेव्हा तेव्हा भाजप बैठकांशिवाय काहीच करीत नाही. आता बैठका खूप झाल्या, दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईची धमक दाखवा, असे आव्हान केजरीवाल यांनी केंद्राला दिले.

दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर जनसभेला संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. कश्मिरात 1990 ची दहशत परतली आहे. तेव्हाही लोकांना खोऱ्याची चिंता होती, आजही तशाच चिंतेचे वातावरण आहे. जेव्हा जेव्हा कश्मीरात हत्या होते, त्यावेळी गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावल्याची बातमी पुढे येते. अशा किती बैठका बोलावणार? आम्हाला आता कारवाई हवीय. कश्मीर, हिंदुस्थान, हिंदुस्थानी सगळे कारवाईची मागणी करताहेत. तुमच्या बैठका खूप झाल्या. लोकांचे बळी जाताहेत. हत्यासत्र रोखण्यासाठी तुम्ही काय प्लान आखलाय ते देशाला सांगा, असे आव्हान केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना दिले. याचवेळी त्यांनी पाकिस्तानलाही कुरापती थांबवण्याचा इशारा दिला. कश्मीरला हिंदुस्थानपासून वेगळे कोणीच करू शकत नाही, असे त्यांनी पाकिस्तानला ठणकावले.