जर देशात दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सर्वस्वी भाजप जबाबदार असेल! संजय राऊत यांचे संतप्त उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या विधानानंतर देशातील वातावरण तापलं आहे. या वातावरणाचा फायदा उचलण्याचा अल कायदासारख्या दहशतवादी संघटना प्रयत्न करत असून त्यांनी दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. या सगळ्या परिस्थितीला भाजप जबाबदार असून जर या देशात जर अशाप्रकारची दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार भाजप असेल असे संतप्त उद्गार शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काढले आहेत.

हिंदुस्थानात धर्माच्या नावावर विद्वेष निर्माण करायचा धर्माच्या नावावर दोन समाजात दंगली घडवून आणायच्या आणि त्यासाठी कोणत्याही थराला जायचं ही भाजपची भूमिका आहे अशी टीका राऊत यांनी केली आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबरांबाबतीत भाजपच्या प्रवक्त्यांनी विधान केलं, ज्यामुळे जगभरात खळबळ माजली. कालपर्यंत शांत असलेल्या अतिरेकी संघटनांनी मानवी बॉम्बने हल्ले घडवण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केली. या देशात जर अशाप्रकारची दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार भाजप असेल असे राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगरातील अतिविराट सभेवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. ‘केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न विचारणं हे टोमणे असतील तर मग आता नवीन डिक्शनरी आणि व्याख्या शोधावी लागेल. कश्मिरी पंडितांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी जे प्रश्न निर्माण केले, त्यावर भाजपकडे , फडणवीसांकडे उत्तर आहे का ? हजारो कश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन केलंय, 27 पंडितांची हत्या झालीय. याबाबत प्रश्न विचारणे हा टोमणा असेल तर हा समस्त हिंदू समाजाचा आणि कश्मिरी पंडितांचा अपमान आहे’ असे राऊत यांनी म्हटले.

संभाजीनगरातील अतिविराट सभा पाहून विरोधकांची बुब्बुळं बाहेर आली असतील असे राऊत म्हणाले. ‘संभाजीनगरचा पाणीप्रश्न, विकासाचे मुद्दे यावर उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली. कश्मिरी पंडितांबाबत भूमिका घेतली, राजकीय भूमिका घेतली. यावर टीका करण्यासारखं काय आहे? पण विरोधासाठी विरोध हे विरोधकांनी धोरण अवलंबलंय त्यामुळे विरोधी पक्षाचाच भविष्यात सत्यानाश होणार आहे’ अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली.