
पहिल्याच पावसात महामार्गावरील दाभीळ उड्डाण पुलाचा मातीचा भराव खचला.पुलावरील मातीत एक ओव्हरलोड कंटेनर फसल्याने महामार्गावरील वाहतूकही खोळंबली होती. पाऊस सुरु होण्याआधी उड्डाण पुलाचे काँक्रीटीकरण होणे गरजेचे होते. मात्र पुलाचे काँक्रीटीकरण न झाल्याने या वर्षी पावसाळ्यात दाभीळ उड्डाण पूल प्रवासी आणि वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाचा पायथा ते परशुराम घाट या दरम्यानच्या 44 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा ठेका कल्याण टोलवेज या कंपनीकडे आहे. गेली तीन वर्ष 44 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण सुरु आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने महामार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी आणि चालक यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. चौपदरीकरणाच्या कामात अनेक त्रुटी असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. पर्यायी मार्गावरील खड्ड्यांमध्ये आदळून वाहने नादुरुस्त होत आहेत.
काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर ज्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे त्या ठिकाणी रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर वाहने जोरात आदळून लहानमोठे अपघात होत आहेत. महामार्गावरील भरणे नाका आणि दाभीळ या दोन उड्डाण पुलांचे काम गेली तीन वर्षे सुरु आहे. मात्र अद्याप या दोन्ही उड्डाण पुलांचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने या पावसाळ्यात वाहन चालक आणि प्रवासी यांना भरणे आणि दाभीळ या ठिकाणी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे.
खेड तालुक्यात मान्सूनचे आगमन झाले आणि पहिल्याच पावसात महामार्गाची दैना उडाली. भरणे नाका येथील पुलाचे काम रखडले असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली तर दाभीळ उड्डाण पुलावरील मातीचा भराव खचल्याने कंटेनर रस्त्यात अडकून पडला. दाभीळ पुलावर फसलेल्या कंटेनर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. मात्र पावसामुळे निसरडा झालेला मातीचा रस्ता आणि कोसळणारा पाऊस यामुळे मातीत फसलेल्या कंटेनर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या.
पुलावर कंटेनर फसल्याने पुलावरील वाहतूक दुसऱ्या मार्गिकेतून सुरु ठेवण्यात आली होती. मात्र वाहनांची वर्दळ असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. पावसामुळे परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम सुरु असल्याने आदीच वाहतुकीचा वेग मंदावला आहे त्यातच कालपासून पाऊस सुरु झाल्याने परशुराम घातली वाहतुक आणखी मंदावली आहे.





























































