‘नगर अर्बन’ घोटाळ्यातील आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुह्यातील आरोपी सचिन दिलीप गायकवाड (रा. श्रीगोंदा) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीगोंदा येथून अटक केली. या गुह्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. नुकताच न्यायालयाने आरोपी गायकवाडचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. न्यायालयाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी नगर अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी व 28 संशयास्पद कर्जदारांचे कर्जखाते, तत्कालीन अध्यक्षांचे निकटचे कार्यकर्ते सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांच्याविरुद्ध 150 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

आरोपी गायकवाड याच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने रकमा जमा झालेल्या होत्या, याचा तपास सुरू करण्यात आला होता. त्यावेळेला त्याच्या खात्यात बँकेने परस्पर पैसे वर्ग केल्याचे तपासामध्ये उघड झाले होते. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन या प्रकरणाचा छडा लावण्याचे काम सुरू केले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.

फिर्यादी गांधी यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयासमोर मांडल्याने आरोपी गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे.